फिरकीचे चक्रव्यूह आता पुरते ‘बूमरँग’ झाले आहे. भारताचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीला हव्या असलेल्या पहिल्या दिवसापासून फिरकीला साथ देणाऱ्या खेळपट्टीने आपले खरेखुरे रंग रविवारी दाखवले. फक्त दु:ख याचेच आहे की, ते भारतासाठी नव्हे तर इंग्लंड संघासाठी अनुकूल ठरले. गतवर्षी वानखेडेवरच झालेल्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्याचा पाचवा दिवस अनपेक्षित घटनांनी युक्त असाच होता. त्या दिवशी चक्क १७ बळी पडले होते. शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेली ती कसोटी दुर्दैवाने अनिर्णीत राहिली होती. फक्त एका धावेमुळे भारताला त्या कसोटी मालिकेवर निर्विवाद वर्चस्व गाजवता आले नव्हते. त्यानंतर अहमदाबादमधील इंग्लंडविरुद्धची पहिली कसोटीही पाचव्या दिवशीपर्यंत लांबली होती. या साऱ्यांचा भावनिकपणे विचार करणाऱ्या धोनीने साडेतीन दिवसांतच कसोटीचा निकाल लागावा, या हेतूने फिरकीचा अतिआग्रह केला. त्यामुळे वानखेडेवर फिरकीचा सापळा रचण्यात आला. पण ‘शिकार खुद यहाँ, शिकार हो गया’ अशी अवस्था भारतीय संघाची झाली. गतवर्षीची पाचव्या दिवशीची रंजकता वानखेडेवर यावेळी तिसऱ्याच दिवशी अनुभवता आली. दुसऱ्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी एकंदर १५ बळी पडले असून, सोमवारी चौथ्या दिवशीच सामना निकाली ठरणार हे स्पष्ट झाले आहे. दिवसअखेर भारताकडे ३१ धावांची नाममात्र आघाडी असून, फक्त तीन फलंदाज आणि दोन पूर्ण दिवस शिल्लक आहेत. सुर्दैवाने गौतम गंभीर (नाबाद ५३) मैदानावर आहे.
रविवारी सकाळी अ‍ॅलिस्टर कुक आणि केव्हिन पीटरसन या दोघांनीही आपल्या कसोटी कारकीर्दीतील २२वी शतके झळकावली. फिरकीला साथ देणाऱ्या खेळपट्टीवर भारतीय त्रिकुटाला सामोरे जात त्यांनी संयमाने किल्ला लढवला. या जोडीने तिसऱ्या विकेटसाठी २०६ धावांची भक्कम भागीदारी रचली. कर्णधारपदाची धुरा सांभाळल्यानंतर सलग दुसऱ्या कसोटी सामन्यात कुकने (१२२) शतक झळकावण्याचा पराक्रम केला. सकाळपासून २२व्या षटकात भारताला कुकच्या रूपात पहिले यश मिळाले. त्यानंतर पीटरसनने समित पटेलसोबत पाचव्या विकेटसाठी ५९ धावांची भागीदारी केली. पीटरसनचा अडसर प्रग्यान ओझाने दूर केला. पण पीटरसनने आपल्याला अनुकूल ठरणाऱ्या भारतीय वातावरणाचा लाभ उचलत २३३ चेंडू आणि सव्वापाच तास मैदानावर टिकाव धरत २० चौकार आणि चार षटकारांनिशी १८६ धावांची शानदार खेळी साकारली. पीटरसनने हे भारताविरुद्ध सहावे शतक साजरे केले. पण तोवर भारताच्या फिरकी गोलंदाजांनी आपले नियंत्रण मिळवले होते. इंग्लंडचे अखेरचे सहा फलंदाज फक्त ५६ धावांत बाद झाले. इंग्लंडने पहिल्या डावात ४१३ धावा उभारत ८६ धावांची आघाडी घेतली.
उर्वरित ३३ षटकांच्या खेळात भारतीय संघ आरामात इंग्लंडची आघाडी भरून काढेल, अशी अपेक्षा होती. पण मॉन्टी पनेसार आणि ग्रॅमी स्वान यांच्या वेगात वळणाऱ्या फिरकीपुढे भारतीय फलंदाजांची अक्षरश: त्रेधातिरपीट उडाली. गंभीर वगळता बाकी सर्वच फलंदाजांनी एकेरी धावसंख्या नोंदवत फक्त हजेरी लावण्याचे कार्य केले. त्यामुळे दिवसअखेर भारताची ७ बाद ११० अशी केविलवाणी अवस्था झाली आहे. त्यामुळे वानखेडेवर सोमवारी इंग्लिश संघ २००६च्या विजयाची पुनरावृत्ती करणार, ही काळ्या दगडावरची रेघ आहे.    

धावफलक
भारत (पहिला डाव) : ३२७.
इंग्लंड (पहिला डाव) : अ‍ॅलिस्टर कुक झे. धोनी गो. अश्विन १२२, निक कॉम्प्टन झे. सेहवाग गो. ओझा २९, जोनाथन ट्रॉट पायचीत गो. ओझा ०, केव्हिन पीटरसन झे. धोनी गो. ओझा १८६, जॉनी बेअरस्टो झे. गंभीर गो. ओझा ९, समित पटेल झे. कोहली गो. ओझा २६, मॅट प्रायर धावचीत २१, स्टुअर्ट ब्रॉड झे. पुजारा गो. हरभजन ६, ग्रॅमी स्वान नाबाद १, जेम्स अँडरसन पायचीत गो. हरभजन २, मॉन्टी पनेसार झे. झहीर गो. अश्विन ४, अवांतर (बाइज ४, लेगबाइज २, वाइड १) ७, एकूण १२१.३ षटकांत सर्व बाद ४१३
बाद क्रम : १-६६, २-६८, ३-२७४, ४-२९८, ५-३५७, ६-३८२, ७-४०६, ८-४०६, ९-४०८, १०-४१३.
गोलंदाजी : आर. अश्विन ४२.३-६-१४५-२, प्रग्यान ओझा ४०-६-१४३-५, झहीर खान १५-४-३७-०, हरभजन सिंग २१-१-७४-२, युवराज सिंग ३-०-८-०.
भारत (दुसरा डाव) : गौतम गंभीर खेळत आहे ५३, वीरेंद्र सेहवाग झे. स्वान गो. पनेसार ९, चेतेश्वर पुजारा झे. बेअरस्टो गो. स्वान ६, सचिन तेंडुलकर पायचीत गो. पनेसार ८, विराट कोहली झे. (बदली) रुट गो. स्वान ७, युवराज सिंग झे. बेअरस्टो गो. पनेसार ८, महेंद्रसिंग धोनी झे. ट्रॉट गो. पनेसार ८, आर. अश्विन झे. पटेल गो. पनेसार ११, हरभजन सिंग खेळत आहे १, अवांतर (बाइज ६, लेगबाइज २) ८, एकूण ३३ षटकांत ७ बाद ११७
बाद क्रम : १-३०, २-३७, ३-५२, ४-६५, ५-७८, ६-९२, ७-११०
गोलंदाजी : जेम्स अँडरसन ४-१-९-०, मॉन्टी पनेसार १६-२-६१-५, ग्रॅमी स्वान १३-४-३९-२.    

चमत्कार होऊ शकतो -गंभीर
‘‘सामना अजूनही संपलेला नाही. जर इंग्लंडचे गोलंदाज भारतीय संघाच्या सात फलंदाजांना ११७ धावांमध्ये गुंडाळू शकतात, तर आमच्याकडे तीन दर्जेदार फिरकी गोलंदाज आहेत. त्यामुळे १२०-१३० धावा जरी आम्ही करू शकलो तरी जिंकण्याची आम्हाला संधी असेल. त्यासाठी मी आणि हरभजन सोमवारी मोठी भागीदारी रचण्याचा प्रयत्न करू. क्रिकेटमध्ये चमत्कार होत असतात आणि तो सोमवारीही होऊ शकतो,’’ असे मत भारताचा सलामीवीर गौतम गंभीर याने व्यक्त केले.
तो म्हणाला की, ‘‘कसोटी क्रिकेटसाठी वानखेडेची खेळपट्टी ही नक्कीच चांगली आणि निर्णय देणारी आहे. आमच्या गोलंदाजांनीही चांगली गोलंदाजी केली, पण पीटरसन आणि कुक यांच्या भागीदारीने आमच्याकडून आघाडी हिरावून घेतली. इंग्लंडच्या फिरकीपटूंनी चेंडू आदर्शवत वेगाने टाकले, त्यामुळे त्यांना झटपट विकेट्स मिळू शकल्या.’’    

आम्ही जिंकायला आलो आहोत -पीटरसन
मुंबई : ‘‘वानखेडेच्या खेळपट्टीवर फलंदाजी करणे सोपे नव्हते. पहिल्या कसोटी सामन्यात मी बचावावर विश्वास ठेवला नव्हता, काही चुकीचे फटके मी पहिल्या सामन्यात खेळलो. पण या सामन्यात बचावावर विश्वास ठेवला आणि त्यामध्ये मी यशस्वी झालो. भारतामध्ये आम्ही दिवसेंदिवस काही गोष्टी शिकत आहोत. आव्हाने स्वीकारायला आम्हाला आवडतात. आम्ही इथे शिकायला आणि जिंकायला आलेलो आहेत,’’ असे मत द्विशतक हुकलेल्या इंग्लंडच्या केव्हिन पीटरसनने सामन्यानंतर व्यक्त केले.
‘‘कुक आणि माझ्यातील भागीदारी संघासाठी फार मोलाची ठरली. शतक झळकावल्याचा आनंद नक्कीच आहे, पण आमच्या भागीदारीच्या जोरावर संघाला आघाडी घेता आली, हे माझ्यासाठी मोलाचे आहे. सोमवारच्या खेळाबाबत मी काहीही भाकीत वर्तवणार नाही. परंतु स्वान आणि पनेसार या दोघांनीही अप्रतिम गोलंदाजी केली असून सोमवारी त्यांच्याकडून अशाच चांगल्या कामगिरीची आशा आहे,’’ असे पीटरसनने सांगितले.    

वानखेडेवरून
कुक, पीटरसनची बाविशी
इंग्लंडचा कर्णधार अ‍ॅलिस्टर कुक आणि केव्हिन पीटरसन यांनी दमदार फलंदाजी करत भारतीय गोलंदाजांची पिसे काढली. यावेळी या दोघांनीही आपल्या कारकीर्दीतील २२व्या शतकाला गवसणी घातली. इंग्लंडच्या वॉली हॅमन्ड यांच्या सर्वाधिक २२ शतकांच्या विक्रमाशी या दोघांनी बरोबरी साधली.     

२९३वी धाव अवांतर
सामन्याच्या तिसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात भारतीय गोलंदाजांना विकेट मिळत नसली तरी त्यांच्या गोलंदाजीमध्ये शिस्त पाहायला मिळाली. पहिल्या सत्रात भारतीय गोलंदाजांकडून एकही आवांतर धाव गेली नाही. उपाहारानंतरच्या झहीर खानच्या पहिल्याच षटकात ‘वाइड’च्या स्वरूपात पहिली अवांतर धाव गेली ती तब्बल २९२ धावा आणि ९५.३ षटकांनंतर.    

दिव्हेचा पेव्हेलियनमध्ये चिडवा-चिडवी
दिव्हेचा पॅव्हेलियनच्या तळमजल्यावर भारतीय प्रेक्षक होते, तर पहिल्या मजल्यावर इंग्लंडचे प्रेक्षक. यावेळी प्रत्येक चेंडूगणिक दोन्ही गटांमध्ये चांगलीच चिडवा-चिडवी रंगली होती. पण यामध्ये दोन्ही गटांमध्ये खेळ भावना होती, त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.    

तिकिटे ‘सोल्ड आऊट’ तरीही..
रविवारी सुट्टीच्या दिवशी मुंबईकरांनी वानेखेडे स्टेडियमवर सामना पाहण्यासाठी एकच गर्दी केली होती. त्यामुळे पहिल्या अध्र्या तासातच तिकीट खिडकीवर ‘सोल्ड आऊट’चा फलक लागला. सर्व तिकिटे विकली गेल्याने स्टेडियम खच्चाखच भरलेले असेल, असे वाटत होते. पण पाच दिवसांचे ‘सीझन’ तिकिटे काढलेल्या बऱ्याच जणांनी रविवारी सामन्याला हजेरीच लावली नाही. इंग्लंडचा संघ सर्व बाद झाल्यावर मात्र भारताची फलंदाजी पाहण्यासाठी स्टेडियममध्ये चांगलीच गर्दी झाली.    
    – प्रसाद मुंबईकर

Story img Loader