फिरकीचे चक्रव्यूह आता पुरते ‘बूमरँग’ झाले आहे. भारताचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीला हव्या असलेल्या पहिल्या दिवसापासून फिरकीला साथ देणाऱ्या खेळपट्टीने आपले खरेखुरे रंग रविवारी दाखवले. फक्त दु:ख याचेच आहे की, ते भारतासाठी नव्हे तर इंग्लंड संघासाठी अनुकूल ठरले. गतवर्षी वानखेडेवरच झालेल्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्याचा पाचवा दिवस अनपेक्षित घटनांनी युक्त असाच होता. त्या दिवशी चक्क १७ बळी पडले होते. शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेली ती कसोटी दुर्दैवाने अनिर्णीत राहिली होती. फक्त एका धावेमुळे भारताला त्या कसोटी मालिकेवर निर्विवाद वर्चस्व गाजवता आले नव्हते. त्यानंतर अहमदाबादमधील इंग्लंडविरुद्धची पहिली कसोटीही पाचव्या दिवशीपर्यंत लांबली होती. या साऱ्यांचा भावनिकपणे विचार करणाऱ्या धोनीने साडेतीन दिवसांतच कसोटीचा निकाल लागावा, या हेतूने फिरकीचा अतिआग्रह केला. त्यामुळे वानखेडेवर फिरकीचा सापळा रचण्यात आला. पण ‘शिकार खुद यहाँ, शिकार हो गया’ अशी अवस्था भारतीय संघाची झाली. गतवर्षीची पाचव्या दिवशीची रंजकता वानखेडेवर यावेळी तिसऱ्याच दिवशी अनुभवता आली. दुसऱ्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी एकंदर १५ बळी पडले असून, सोमवारी चौथ्या दिवशीच सामना निकाली ठरणार हे स्पष्ट झाले आहे. दिवसअखेर भारताकडे ३१ धावांची नाममात्र आघाडी असून, फक्त तीन फलंदाज आणि दोन पूर्ण दिवस शिल्लक आहेत. सुर्दैवाने गौतम गंभीर (नाबाद ५३) मैदानावर आहे.
रविवारी सकाळी अॅलिस्टर कुक आणि केव्हिन पीटरसन या दोघांनीही आपल्या कसोटी कारकीर्दीतील २२वी शतके झळकावली. फिरकीला साथ देणाऱ्या खेळपट्टीवर भारतीय त्रिकुटाला सामोरे जात त्यांनी संयमाने किल्ला लढवला. या जोडीने तिसऱ्या विकेटसाठी २०६ धावांची भक्कम भागीदारी रचली. कर्णधारपदाची धुरा सांभाळल्यानंतर सलग दुसऱ्या कसोटी सामन्यात कुकने (१२२) शतक झळकावण्याचा पराक्रम केला. सकाळपासून २२व्या षटकात भारताला कुकच्या रूपात पहिले यश मिळाले. त्यानंतर पीटरसनने समित पटेलसोबत पाचव्या विकेटसाठी ५९ धावांची भागीदारी केली. पीटरसनचा अडसर प्रग्यान ओझाने दूर केला. पण पीटरसनने आपल्याला अनुकूल ठरणाऱ्या भारतीय वातावरणाचा लाभ उचलत २३३ चेंडू आणि सव्वापाच तास मैदानावर टिकाव धरत २० चौकार आणि चार षटकारांनिशी १८६ धावांची शानदार खेळी साकारली. पीटरसनने हे भारताविरुद्ध सहावे शतक साजरे केले. पण तोवर भारताच्या फिरकी गोलंदाजांनी आपले नियंत्रण मिळवले होते. इंग्लंडचे अखेरचे सहा फलंदाज फक्त ५६ धावांत बाद झाले. इंग्लंडने पहिल्या डावात ४१३ धावा उभारत ८६ धावांची आघाडी घेतली.
उर्वरित ३३ षटकांच्या खेळात भारतीय संघ आरामात इंग्लंडची आघाडी भरून काढेल, अशी अपेक्षा होती. पण मॉन्टी पनेसार आणि ग्रॅमी स्वान यांच्या वेगात वळणाऱ्या फिरकीपुढे भारतीय फलंदाजांची अक्षरश: त्रेधातिरपीट उडाली. गंभीर वगळता बाकी सर्वच फलंदाजांनी एकेरी धावसंख्या नोंदवत फक्त हजेरी लावण्याचे कार्य केले. त्यामुळे दिवसअखेर भारताची ७ बाद ११० अशी केविलवाणी अवस्था झाली आहे. त्यामुळे वानखेडेवर सोमवारी इंग्लिश संघ २००६च्या विजयाची पुनरावृत्ती करणार, ही काळ्या दगडावरची रेघ आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा