BCCI is preparing to organize a new league like IPL : आयपीएल २०२४ च्या हंगामाचा लिलाव १९ डिसेंबरला होणार आहे. या लिलापूर्वी एक मोठी बातमी समोर आली आहे. जगभरातील १०-१० षटकांच्या क्रिकेट सामन्यांना मिळालेला उदंड प्रतिसाद पाहता, या फॉरमॅटचे सामने भारतातही सुरू होण्याच्या तयारीत आहेत. बीसीसीआय क्रिकेटच्या या सर्वात लहान आणि नवीन स्वरूपाची लीग सुरू करण्याचा विचार करत आहे. त्यासाठीची ब्लू प्रिंट पूर्णपणे तयार झाली आहे. सर्व काही सुरळीत राहिल्यास पुढील वर्षी सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये ही लीग खेळवली जाऊ शकते.
मनीकंट्रोलने दिलेल्या अहवालात असे समोर आले आहे की, टी-१० फॉरमॅटमध्ये लीग सुरू करण्याची बीसीसीआयची योजना भागधारकांना खूप आवडली आहे. तसे, ही लीग २०-२० षटकांच्या फॉरमॅटमध्येही खेळवली जाण्याची शक्यता आहे. यावर अजून विचार चालू आहे. यामध्ये सहभागी होणाऱ्या खेळाडूंची वयोमर्यादा निश्चित करण्याबाबतही विचार सुरू आहे. आयपीएल आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटवर त्याचा कोणताही परिणाम होऊ नये म्हणून वयोमर्यादा निश्चित केली जाऊ शकते.
बीसीसीआयला आयपीएल फ्रँचायझींची संमती घ्यावी लागणार
बीसीसीआयची ही योजना आयपीएल फ्रँचायझींच्या संमतीवर अवलंबून असेल. वास्तविक, बीसीसीआयचा आयपीएल फ्रँचायझींसोबत या प्रकरणात करार आहे. म्हणजेच आयपीएलसारखी दुसरी लीग सुरू करायची असल्यास बीसीसीआयला आयपीएल फ्रँचायझींची संमती घ्यावी लागेल. त्यामुळे जुन्या फ्रँचायझींना नव्या लीगमधून कोणतेही आर्थिक नुकसान सहन करावे लागणार नाही.
सध्या या आराखड्याला चांगले स्वरूप देण्यासाठी चर्चा सुरू आहे. ज्यामध्ये ही लीग दरवर्षी भारतात खेळवली जावी की दरवर्षी वेगळ्या ठिकाणी आयोजित करावी यावरही विचार केला जात आहे. टी-१० आणि टी-२० मध्ये कोणत्या फॉरमॅटमध्ये खेळले जावे? वयोमर्यादा ठेवावी की नाही? या नवीन लीगमध्ये फ्रँचायझीची नव्याने विक्री करावी की आयपीएल फ्रँचायझींसोबत नवीन करार करावा? या सर्व प्रश्नांची उत्तरे येत्या काही दिवसांत मिळू शकतील