‘सेहवाग हा अनुभवी खेळाडू आहे, त्याला फॉर्मात यायला अजून वेळ द्यायला हवा’ हे वाक्य भारताचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने पहिल्या कसोटी सामन्यानंतर उच्चारल्यावर शेवटच्या दोन कसोटी सामन्यांसाठी निवड करताना सलामीवीर वीरेंद्र सेहवागला डच्चू देण्यात येणार हे काही जणांनी ओळखले होते, त्याचाच प्रत्यय गुरुवारी आला. अखेरच्या दोन सामन्यांसाठी निवड करताना सेहवागला वगळण्यात आले असले तरी सुमार कामगिरी करणारा ‘ऑफ-स्पिनर’ हरभजन सिंगला मात्र जीवदान देण्यात आले. एकीकडे सेहवागला वगळताना दुसऱ्या सलामीवीराला संधी न देण्याचा निर्णय घेत ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सराव सामन्यात शतक झळकावणाऱ्या गौतम गंभीरला पुनरागमनापासून दूर ठेवले आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दोन सामन्यांमधील तीन डावांमध्ये सेहवागला फक्त २७ धावाच करता आल्या होत्या. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेनंतर गौतमला वगळण्याचा गंभीर निर्णय निवड समितीने घेतला होता. त्यामुळे २००४ नंतर पहिल्यांदाच या जोडीपैकी एकही जण मैदानात दिसणार नाही. या दोघांनी आतापर्यंत ८७ डावांमध्ये ५२.५२ च्या सरासरीने ४४१२ धावा केल्या आहेत. सेहवागला वगळल्यामुळे मुरली विजयबरोबर शिखर धवन किंवा अजिंक्य रहाणेला संधी देण्यात येऊ शकते. पण यापूर्वीच निवड समिती अध्यक्ष संदीप पाटील यांनी अजिंक्यला मधल्या फळीसाठी घेतले असल्याचे संकेत दिल्याने तिसऱ्या सामन्यात विजयबरोबर धवन सलामीला येण्याची दाट शक्यता आहे.
सेहवागने इंग्लंविरुद्धच्या पहिल्या सामन्यात शतक झळकावले होते, पण त्यानंतर त्याला एकदाही अर्धशतकाची वेस ओलांडता आली नव्हती. ऑस्ट्रेलियातील आठ डावांमध्ये सेहवागला फक्त १९८ धावा करता आल्या होत्या. तर मायदेशातील दोन कसोटी सामन्यांमध्ये एकही अर्धशतक झळकावता आले नव्हते. त्यामुळे गेल्या वर्षभरातील फॉर्म पाहता सेहवागला डच्चू देण्यात आला.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांमध्ये जिथे ऑफ स्पिनर आर. अश्विन विजयात मोलाचा वाट उचलताना दिसला तिथे हरभजनला फक्त पाच विकेट्स मिळवता आल्या. ‘हरभजनच्या कामगिरीत सुधारणा होत आहे,’ असे धोनीने म्हणत त्याची पाठराखण केली होती. त्यामुळे या वेळी त्याला संघात कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.
उर्वरित दोन सामन्यांसाठी भारतीय संघ : महेंद्रसिंग धोनी (कर्णधार), सचिन तेंडुलकर, मुरली विजय, शिखर धवन, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, विराट कोहली, रवींद्र जडेजा, आर. अश्विन, अशोक दिंडा, हरभजन सिंग, भुवनेश्वर कुमार, प्रग्यान ओझा आणि इशांत शर्मा.
संघात पुन्हा परतेन – सेहवाग
नवी दिल्ली : मला माझ्या खेळावर पूर्ण विश्वास आहे, त्यामुळे माझे संघात पुनरागमन होईल, हा मला विश्वास आहे. संघात पुनरागमन करण्यासाठी मी अथक मेहनतीवर अधिक भर देणार आहे. माझ्याकडून संघाला आगामी सामन्यांसाठी शुभेच्छा, असे सेहवगाने ट्विटरवर म्हटले आहे.
गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी संधी मिळाली पाहिजे – रैना
नवी दिल्ली : मधल्या फळीतील खेळाडू सुरेश रैनाला आतापर्यंत मिळालेल्या संधीचा उपयोग भारतीय कसोटी संघातील स्थान पक्के करण्यासाठी करता आला नाही. पण आपण आता परिपक्व फलंदाज झालो असून गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी आणखी एक संधी मिळायला हवी, असे मत रैनाने व्यक्त केले. ‘‘मी फलंदाजीवर बरीच मेहनत केली आहे. भारतीय कसोटी संघात खेळण्याची संधी मिळाल्यास, मी त्या संधीचे सोने करीन. गेल्या काही महिन्यांत माझी कामगिरी चांगली झाली असून मी कसोटी संघात नक्कीच पुनरागमन करेन, याची खात्री आहे. भारताची गाडी विजयाच्या ट्रॅकवर आली आहे, याचा मला आनंद होत आहे,’’ असे रैना म्हणाला.
हसीचा पुनरागमनाचा विचार नाही!
मेलबर्न : भारताविरुद्धच्या दोन्ही कसोटीत पराभूत व्हावे लागल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडू माईक हसीच्या पुनरागमनाची जोरदार चर्चा होती. पण आपला पुनरागमनाचा कोणताच विचार नसल्याचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती पत्करलेल्या हसीने सांगितले. ‘‘ऑस्ट्रेलियन संघाने फलंदाजांवर दडपण आणण्यापेक्षा त्यांच्यावर विश्वास दाखवायला हवा. या दौऱ्यासाठी निवडलेल्या फलंदाजांना ऑस्ट्रेलियाने संधी द्यायला हवी. फिरकी गोलंदाजांना साथ देणाऱ्या खेळपट्टय़ांवर मोठी खेळी साकारणे, हे नेहमीच आव्हानात्मक असते. भारतात याआधी कसोटी सामने खेळण्याचा अनुभव नसल्यास, खेळपट्टय़ांवर उभे राहणे कठीण असते,’’ असेही हसीने सांगितले.
वीरेंद्र सेहवागला वगळल्याचा धक्का बसला – हेडन
मुंबई : भारताचा तडाखेबंद सलामीवीर वीरेंद्र सेहवागला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या आगामी दोन कसोटी सामन्यांसाठी वगळण्याचा अनपेक्षित धक् का ऑस्ट्रेलियाचा माजी सलामीवीर मॅथ्यू हेडनला बसला आहे. वीरेंद्र सेहवागला वगळल्याचा जबरदस्त धक्का मला बसला आहे. गौतम गंभीरला वगळणेही अनपेक्षित होते. भारताच्या या दोन्ही सलामीवीरांचे गोलंदाजांवर दडपण असायचे, असे हेडन म्हणाला.
तो पुढे म्हणाला की, सेहवागला वगळणे हे निराशाजनक आहे. स्थानिक सामन्यांमध्ये एखाद्या खेळाडूने चांगली कामगिरी केल्याने त्या युवा खेळाडूला संघात स्थान देण्यात आले असावे. क्रिकेटमध्ये केलेल्या धावा, मिळवलेले बळी आणि पकडलेले झेल, हीच तुमची पुंजी असते.