‘सेहवाग हा अनुभवी खेळाडू आहे, त्याला फॉर्मात यायला अजून वेळ द्यायला हवा’ हे वाक्य भारताचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने पहिल्या कसोटी सामन्यानंतर उच्चारल्यावर शेवटच्या दोन कसोटी सामन्यांसाठी निवड करताना सलामीवीर वीरेंद्र सेहवागला डच्चू देण्यात येणार हे काही जणांनी ओळखले होते, त्याचाच प्रत्यय गुरुवारी आला. अखेरच्या दोन सामन्यांसाठी निवड करताना सेहवागला वगळण्यात आले असले तरी सुमार कामगिरी करणारा ‘ऑफ-स्पिनर’ हरभजन सिंगला मात्र जीवदान देण्यात आले. एकीकडे सेहवागला वगळताना दुसऱ्या सलामीवीराला संधी न देण्याचा निर्णय घेत ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सराव सामन्यात शतक झळकावणाऱ्या गौतम गंभीरला पुनरागमनापासून दूर ठेवले आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दोन सामन्यांमधील तीन डावांमध्ये सेहवागला फक्त २७ धावाच करता आल्या होत्या. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेनंतर गौतमला वगळण्याचा गंभीर निर्णय निवड समितीने घेतला होता. त्यामुळे २००४ नंतर पहिल्यांदाच या जोडीपैकी एकही जण मैदानात दिसणार नाही. या दोघांनी आतापर्यंत ८७ डावांमध्ये ५२.५२ च्या सरासरीने ४४१२ धावा केल्या आहेत. सेहवागला वगळल्यामुळे मुरली विजयबरोबर शिखर धवन किंवा अजिंक्य रहाणेला संधी देण्यात येऊ शकते. पण यापूर्वीच निवड समिती अध्यक्ष संदीप पाटील यांनी अजिंक्यला मधल्या फळीसाठी घेतले असल्याचे संकेत दिल्याने तिसऱ्या सामन्यात विजयबरोबर धवन सलामीला येण्याची दाट शक्यता आहे.
सेहवागने इंग्लंविरुद्धच्या पहिल्या सामन्यात शतक झळकावले होते, पण त्यानंतर त्याला एकदाही अर्धशतकाची वेस ओलांडता आली नव्हती. ऑस्ट्रेलियातील आठ डावांमध्ये सेहवागला फक्त १९८ धावा करता आल्या होत्या. तर मायदेशातील दोन कसोटी सामन्यांमध्ये एकही अर्धशतक झळकावता आले नव्हते. त्यामुळे गेल्या वर्षभरातील फॉर्म पाहता सेहवागला डच्चू देण्यात आला.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांमध्ये जिथे ऑफ स्पिनर आर. अश्विन विजयात मोलाचा वाट उचलताना दिसला तिथे हरभजनला फक्त पाच विकेट्स मिळवता आल्या. ‘हरभजनच्या कामगिरीत सुधारणा होत आहे,’ असे धोनीने म्हणत त्याची पाठराखण केली होती. त्यामुळे या वेळी त्याला संघात कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.
उर्वरित दोन सामन्यांसाठी भारतीय संघ : महेंद्रसिंग धोनी (कर्णधार), सचिन तेंडुलकर, मुरली विजय, शिखर धवन, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, विराट कोहली, रवींद्र जडेजा, आर. अश्विन, अशोक दिंडा, हरभजन सिंग, भुवनेश्वर कुमार, प्रग्यान ओझा आणि इशांत शर्मा.
आगामी दोन कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघाची निवड ; सेहवागला डच्चू, हरभजनला जीवदान
‘सेहवाग हा अनुभवी खेळाडू आहे, त्याला फॉर्मात यायला अजून वेळ द्यायला हवा’ हे वाक्य भारताचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने पहिल्या कसोटी सामन्यानंतर उच्चारल्यावर शेवटच्या दोन कसोटी सामन्यांसाठी निवड करताना सलामीवीर वीरेंद्र सेहवागला डच्चू देण्यात येणार हे काही जणांनी ओळखले होते, त्याचाच प्रत्यय गुरुवारी आला.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 08-03-2013 at 04:22 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sehwag dropped from indian squad for remaining two tests