नवी दिल्ली : टोक्यो ऑलिम्पिकसाठी भारतीय हॉकी संघात निवड हे माझ्या कारकीर्दीतील सर्वात मोठे यश आहे. त्यामुळे माझ्या दिवंगत वडिलांची स्वप्नपूर्ती झाली आहे, असे युवा हॉकीपटू लालरेमसियामीने सांगितले.
२१ वर्षीय लालरेमसियामी या ऑलिम्पिकसाठी भारतीय संघात निवड झालेली मिझोरामची पहिली महिला हॉकीपटू आहे. तिरंदाज सी. लालरेमसंगानंतर ऑलिम्पिकसाठी २५ वर्षांनी ही मिझोरामची खेळाडू पात्र ठरली आहे. गतवर्षी हिरोशिमा (जपान) येथे झालेल्या एफआयएच सीरिज हॉकी स्पर्धेच्या अंतिम टप्प्यातील चिलीविरुद्धच्या उपांत्य सामन्याच्या आदल्या दिवशी तिच्या वडिलांचे निधन झाले. परंतु मायदेशी परतण्याऐवजी तिने स्पर्धेत खेळत राहण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर भारताने जपानला ३-१ असे नमवून स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.
‘‘मला वडिलांचे नेहमी पाठबळ होते. मायदेशी न परतण्याचा निर्णय वडिलांनाही आवडला असता. देशाची सेवा करणे आणि ऑलिम्पिकमध्ये प्रतिनिधित्व करणे हे त्यांचेच स्वप्न होते,’’ असे लालरेमसियामी म्हणाली.