भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या दोन्ही कसोटी जिंकल्या असल्या तरी संघातील सलामीवीर वीरेंद्र सेहवाग याच्या स्थानाबाबत पुनर्विचार करण्याची आवश्यकता आहे. विशेषत: आगामी दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्याचा विचार करताना पर्यायी फलंदाज निवडण्याची आवश्यकता आहे, असे ज्येष्ठ कसोटीपटू राहुल द्रविड याने येथे सांगितले.
पहिल्या दोन्ही कसोटीत सेहवाग सपशेल अपयशी ठरला. त्याने या सामन्यांमधील तीन डावांमध्ये मिळून फक्त २७ धावा केल्या आहेत. त्याचा सलामीतील सहकारी मुरली विजय याने दुसऱ्या कसोटीत १६७ धावा करीत आपली निवड सार्थ ठरविली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या उर्वरित दोन्ही कसोटींकरिता भारतीय संघाची निवड गुरुवारी केली जाणार आहे.
द्रविड याने सांगितले, सेहवाग हा महान फलंदाज असला तरी सध्याच्या मोसमातील त्याचे अपयश विचारात घेण्याजोगे आहे. भारतीय संघ आफ्रिकेच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्याकरिता संघ निवडताना पर्यायी सलामीवीर निवडला जाणार असेल तर या फलंदाजास एकदम परदेशात खेळविण्याऐवजी त्याला येथील उर्वरित दोन कसोटींमध्ये संधी दिली तर हा अनुभव त्याला आफ्रिकेत उपयोगी होईल. आफ्रिकेत सेहवागलाच संधी दिली जाणार असेल तर त्याचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी त्याला कांगारुंविरुद्धच्या उर्वरित दोन्ही कसोटींमध्येही खेळविणे आवश्यक आहे.
आफ्रिकेत डेल स्टेन, मोर्न मोर्कल, फिलँडर आदी भेदक गोलंदाजांना सामोरे जावे लागणार आहे याचा विचार करीत तरुण फलंदाजास आत्मविश्वास निर्माण करुन देण्याकरिता ऑस्ट्रेलियाविरुद्ध संधी दिली पाहिजे. सेहवागला मधल्या फळीत खेळण्यासाठी पाचारण करण्याचा पर्यायही चाचपला पाहिजे. सेहवागनेही मधल्या फळीत खेळण्याची तयारी यापूर्वी दर्शविली होती, असेही द्रविड याने सांगितले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा