सध्या ‘फॉर्मा’त नसलेला भारताचा क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग याला कसोटीमध्ये सलामीला पाठवायचे का, याचा निवड समितीने विचार करायला हवा, असे मत भारताची माजी क्रिकेटपटू राहुल द्रविड याने व्यक्त केले. या वर्षाच्या दुसऱया सहामाहीत भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेच्या दौऱयावर जाणार आहे. त्यावेळी सेहवागला सलामीला पाठविण्याच्या निर्णयाचा फेरविचार केला गेला पाहिजे, असे द्रविडने म्हटले आहे.
तो म्हणाला, सेहवाग व्यवस्थित खेळतोय. भारतीय संघाच्या दृष्टीनेही तो खुप उपयुक्त फलंदाज आहे. मात्र, वस्तुस्थिती ही आहे की, गेल्या दोन ते तीन वर्षांतील परदेशी दौऱयांमध्ये त्याची कामगिरी फार समाधानकारक झालेली नाही. सेहवागलाच सलामीला पाठवण्याबाबत निवड समितीच्या सदस्यांना विश्वास असेल, तर मात्र काहीच हरकत नाही. त्यामुळे सलामीला फलंदाजी करून चांगली कामगिरी करण्यासाठी सेहवागचाही आत्मविश्वास बळावेल.