तब्बल ४० वेळा रणजी करंडक जिंकणाऱ्या मुंबईचे आव्हान यंदा उपांत्यपूर्व फेरीत संपुष्टात आले. त्यानंतर मुंबई क्रिकेटमध्ये अपेक्षेप्रमाणेच झाडाझडती सुरू झाली. मुंबईचे प्रशिक्षक सुलक्षण कुलकर्णी यांची प्रशिक्षकपदावरून हकालपट्टी करण्यात आली. मुंबई पराभूत झाल्यानंतर तांत्रिक समितीने प्रशिक्षक कुलकर्णी आणि निवड समिती बरखास्त करण्याची शिफारस केली होती. त्यानंतर मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या कार्यकारिणी समितीने कुलकर्णी यांची हकालपट्टी करण्याचा निर्णय घेतला, तर निवड समितीला मात्र हंगाम संपेपर्यंत अभय देण्यात आले आहे. प्रशिक्षक आणि खेळाडू यांच्यातील संघर्ष मुंबईच्या पराभवाला कारणीभूत ठरल्याची चर्चाही क्रिकेट वर्तुळात होत आहे. परंतु मुंबईसाठी सर्वच गटांमध्ये यंदाचा हंगाम वाईट ठरला आहे. त्यामुळे मुंबईच्या कामगिरीचे एकंदर आत्मपरीक्षण करून मगच निर्णय व्हायला हवा होता, असे मत ‘चर्चेच्या मैदानातून’च्या व्यासपीठावर व्यक्त करण्यात आले आहे.

सुलक्षण कुलकर्णी,
मुंबईचे माजी प्रशिक्षक
अपयश हे केव्हाही एका दिवसात येत नसते, ती अनेक दिवसांची प्रक्रिया असते. महाराष्ट्राविरुद्ध दुसऱ्या डावात आमची फलंदाजी कोसळली, हेच फक्त अपयश नव्हे. एमसीएच्या तांत्रिक समितीसमोर मी मुंबईच्या कामगिरीची सविस्तर चर्चा केली. संघातील महत्त्वाचे दहा खेळाडू हंगामात पूर्णत: उपलब्ध नव्हते. तसेच दुसरी फळीसुद्धा तितकी सक्षम नव्हती. १९७१मध्ये मुंबईचे सहा खेळाडू अनुपलब्ध होते, तरीही आपण रणजी करंडक जिंकलो होतो. कारण त्यावेळी मुंबईच्या क्रिकेटचा ढाचा सक्षम होता. दुसरी व तिसरी फळीसुद्धा चांगली होती. सध्या क्लब व ऑफिस क्रिकेटचा ढाचा योग्य नाही. या सर्व गोष्टींचा विचार करण्याची गरज आहे. बाकी एमसीएच्या निर्णयाचे मला अजिबात आश्चर्य वाटलेले नाही. कारण रणजी, इराणी, विल्स जेतेपदासहित ३५ पैकी ३३ सामने प्रशिक्षक बलविंदरसिंग संधू यांनी जिंकून दिले होते. परंतु १९९७-९८च्या उपांत्य फेरीत मुंबई हरली व त्यांना पद गमवावे लागले. तर प्रवीण अमरेंच्या मार्गदर्शनाखाली मुंबईने पाचपैकी तीन रणजी जेतेपद जिंकले. मात्र २०१०-११चा एक हंगाम मुंबईसाठी खराब गेला व त्यांचे पदही गेले.

पी. व्ही. शेट्टी,
एमसीएचे संयुक्त सचिव
एमसीए कार्यकारी समितीच्या बैठकीमध्ये झालेल्या चर्चेनंतर प्रशिक्षक सुलक्षण कुलकर्णी यांची सेवा स्थगित करण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. हा कार्यकारिणी समितीचा निर्णय आहे आणि आमच्या बैठकीमध्ये त्याबाबतच्या कारणांविषयी गांभीर्याने चर्चा करण्यात आली. त्याबाबत मी सविस्तर बोलू शकत नाही. निवड समितीसुद्धा बदलण्याची सूचना करण्यात आली होती. परंतु कार्यरत निवड समितीला मात्र उर्वरित हंगामासाठी बदलण्यात आलेले नाही. कारण नवीन निवड समिती नियुक्त केल्यास त्यांना वर्षभराची खेळाडूंची बारकाईने माहिती नसेल. आता उर्वरित महिन्याभरासाठी भारतीय ‘अ’ संघाचे प्रशिक्षक लालचंद रजपूत यांच्याकडे आम्ही मार्गदर्शनाची धुरा सोपवत आहोत. मुंबईच्या वाईट हंगामामुळे भविष्याचा विचार करून अनेक गोष्टी करण्याचे आम्ही ठरवले होते. परंतु आता हंगाम संपत आला असल्यामुळे तातडीने आम्ही काही निर्णयच अमलात आणले आहेत.

लालचंद रजपूत,
भारतीय ‘अ’ संघाचे प्रशिक्षक
मुंबईचा संघ उपांत्यपूर्व फेरीच्या पुढे जाऊ शकला नाही, त्यामुळे त्याचे पडसाद उमटणे अभिप्रेतच होते. परंतु ते इतके तीव्र असतील, असे वाटले नव्हते. पराभवानंतर प्रशिक्षक, निवड समिती, जाणकारांशी चर्चा करून त्याची मीमांसा होण्याची आवश्यकता होती. हंगामात झालेल्या चुकांच्या दोन्ही बाजू अभ्यासल्यानंतर मग भविष्याच्या दृष्टीने काही निर्णय घ्यायला हवे होते. याच्या बाहेर येऊन विचार केल्यास एखादा संघ प्रत्येकदा रणजी जिंकणार, असे कसे काय गृहीत धरले जाते? एखादे वर्ष वाईट ठरल्यास मग प्रशिक्षकाची गच्छंती झाल्याचे बऱ्याचदा घडले आहे. त्यामुळे मुंबईसारखा संघ पराभूत झाल्यास सर्वप्रथम त्याच्या कारणांची गांभीर्याने चर्चा व्हायला हवी. दुखापती, प्रशिक्षकाचे मार्गदर्शन, प्रशिक्षक-कर्णधार समन्वय आदी मुद्दय़ांचा सखोल अभ्यास व्हायला हवा. गेल्या वर्षी आपण बहुतांशी सर्वच स्पर्धा जिंकल्या, या वर्षीचा हंगाम सर्वासाठीच वाईट ठरला. इतका मोठा बदल कसा काय पाहायला मिळाला, याचे आत्मपरीक्षण करण्याची आवश्यकता आहे.

Story img Loader