ऑलिम्पिक कांस्यपदक, चार आंतरराष्ट्रीय स्पर्धाची जेतेपदे आणि वर्षांतील ५१ आठवडे जागतिक क्रमवारीत अव्वल पाच महिला खेळाडूंमध्ये टिकविलेले स्थान यामुळे सायना नेहवाल आणि पर्यायाने भारतीय बॅडमिंटनसाठी हे वर्ष धवल यशाचे ठरले. मात्र पैसा आणि प्रायोजक यांची साथ लाभल्यावर आपल्या खेळण्यावर त्यांचा जास्त हक्क होतोय का? हे आत्मपरीक्षण सायनाला यावर्षी घडलेल्या घटनांतून करावे लागेल.
ऑलिम्पिक पदक हे कोणत्याही क्रीडापटूसाठी आयुष्यभराचे स्वप्न असते. लहान वयापासून प्रचंड मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर सायनाने चीनच्या मक्तेदारीला आव्हान देत आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय झेंडा रोवला. लंडन ऑलिम्पिकमधील कांस्यपदकाने बॅडमिंटनमध्ये चीनच्या पाठोपाठ भारत आहे, हा विश्वास दिला. या पदकाने सायनाचे क्षितीज विस्तारले. बॅडमिंटन क्षेत्राला आणि पर्यायाने अन्य खेळातील क्रीडापटूंना सुखद धक्का देणारी गोष्ट म्हणजे सायनाने ऱ्हिती स्पोर्ट्स मॅनेजमेंटशी केलेला ४० कोटींचा करार. या करारामुळे जगातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या बॅडमिंटनपटूंच्या मांदियाळीत तिने स्थान पटकावले. तुमचे नाणे
जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानी असलेल्या वांग यिहानला नमवत सायनाने स्विस खुल्या स्पर्धेचे जेतेपद नावावर केले. सलग दुसऱ्या वर्षी सायनाने या स्पर्धेत जेतेपदावर आपली मोहोर उमटवली. थायलंडची उदयोन्मुख खेळाडू रॅचानोक इन्टानॉनवर मात करत थायलंड खुल्या स्पर्धेच्या जेतेपदाची कमाई केली. कुठल्याही आंतरराष्ट्रीय स्पर्धेत जेतेपदात सायनासमोर प्रमुख अडथळा असणाऱ्या लि झुरूईला चीतपट करत सायनाने इंडोनेशियन सुपर सीरिज जेतेपदावर कब्जा केला. या स्पर्धेचे सायनाचे हे तिसरे जेतेपद. इंडोनेशियात खेळताना मिळणारा चाहत्यांचा अफाट प्रतिसाद जिंकण्यासाठी प्रेरणा देतो, असे सायनाने विजयानंतर बोलताना सांगितले. ऑलिम्पिक पदकानंतर गुडघ्याच्या दुखापतीमुळे तिने विश्रांती घेतली. गुडघा साथ देत नसतानाही जर्मनीच्या ज्युलियन शेंकचा पराभव करत तिने डेन्मार्क खुल्या स्पर्धेचे जेतेपद नावावर केले. त्यानंतर लगेचच झालेल्या हाँगकाँग सुपर सीरिज स्पर्धेत मात्र तिला दुसऱ्याच फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले. सुपर सीरिज फायनल्समध्ये तिने उपांत्य फेरीपर्यंत धडक मारली.
सायना नेहवालच्या बरोबरीने युवा बॅडमिंटनपटूंनी आंतरराष्ट्रीय तसेच राष्ट्रीय स्तरावर दिमाखदार कामगिरी केली. जागतिक क्रमवारीत २४व्या स्थानी असणाऱ्या पी.व्ही. सिंधूने आशियाई युवा १९ वर्षांखालील अजिंक्यपद स्पर्धेत जेतेपद पटकावले. चीनमध्ये नुकत्यात झालेल्या सुपर सीरिज स्पर्धेत ली झुरूईला नमवण्याची करामतही सिंधूने करून दाखवली. आनंद पवारने स्कॉटिश खुल्या स्पर्धेच्या जेतेपदावर नाव कोरले. बहरिन खुल्या स्पर्धेत बी. साईप्रणिथने पुरुषांमध्ये तर नागपूरच्या अरुंधती पानतावणेने महिलांमध्ये जेतेपदावर कब्जा केला. के. श्रीकांतने मालदीव आंतरराष्ट्रीय स्पर्धेत जेतेपदाला गवसणी घातली. ऑलिम्पिकमध्ये उपांत्यपूर्व फेरीपर्यंत धडक मारणाऱ्या पी.कश्यपने राष्ट्रीय जेतेपद पटकावले. पुणेकर सायली गोखलेने पी.व्ही सिंधूवर मात करत राष्ट्रीय जेतेपदाचा मान पटकावला. पी.सी. तुलसीने टाटा खुल्या स्पर्धेच्या जेतेपदावर आपलेसे केले. हर्षल दाणी, आदित्य जोशी, रुथविका शिवानी हे कनिष्ट गटात राष्ट्रीय विजेते ठरले.
भारतीय बॅडमिंटनपटूंना मालामाल होऊ शकतील अशा इंडियन बॅडमिंटन लीगची घोषणा करण्यात आली. मुंबईकर बॅडमिंटनटू प्राजक्ता सावंतने राष्ट्रीय प्रशिक्षक गोपीचंद यांच्याविरोधात मानसिक छळाचे कारण देत कोर्टात याचिका दाखल केली. राष्ट्रीय प्रशिक्षक, निवड समितीचे सदस्य असलेल्या व्यक्तीने खाजगी अकादमी चालवू नये, असा निर्वाळा कोर्टाने दिला. कोर्टाच्या आदेशानंतर प्रशिक्षकपद यशस्वीपणे भूषवणाऱ्या गोपीचंद यांना भारतीय बॅडमिंटन संघटना पदावरून काढणार का? प्रशिक्षकपद सांभाळणाऱ्या अनेक व्यक्तींच्या वैयक्तिक अकादमी आहेत. त्यामुळे पूर्वग्रह टाळण्यासाठी स्वतंत्र निवड समितीची स्थापना होणार का याची उत्तरे नवीन वर्षच देऊ शकते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा