टोक्यो : कोणालाही फारशी अपेक्षा नसतानाही आम्ही टोक्यो ऑलिम्पिकमध्ये उपांत्य फेरीपर्यंत मजल मारून चौथे स्थान मिळवले. या कामगिरीवर अद्यापही विश्वास बसत नाही, अशी प्रतिक्रिया भारतीय महिला हॉकी संघाची कर्णधार राणी रामपालने व्यक्त केली.

राणीच्या नेतृत्वाखाली भारताने ऑलिम्पिकच्या इतिहासात प्रथमच उपांत्य फेरी गाठली; परंतु अर्जेंटिनाने त्यांचा पराभव केला. त्यानंतर कांस्यपदकाच्या लढतीतही ब्रिटनने भारताला नमवले. त्यामुळे ऐतिहासिक ऑलिम्पिक पदक जिंकण्याचे त्यांचे स्वप्न भंगले. मात्र ऑलिम्पिकमध्ये चौथे स्थान मिळवणे, हीच बाब आमच्यासाठी अभिमानास्पद असल्याचे राणीने सांगितले.

‘‘रिओ ऑलिम्पिकमध्ये आम्हाला १२व्या स्थानी समाधान मानावे लागले. पाच वर्षांच्या मेहनतीनंतर आम्ही यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये थेट चौथा क्रमांक मिळवू, असा विचारही केला नव्हता,’’ असे राणी म्हणाली.

‘‘सर्वप्रथम आम्ही उपांत्यपूर्व फेरीचे लक्ष्य डोळ्यांसमोर ठेवले होते. मात्र बलाढ्य ऑस्ट्रेलियाला नमवून उपांत्य फेरी गाठल्यावर आम्हाला स्वत:लाच आमच्या कामगिरीवर विश्वास बसत नव्हता. पदक न जिंकल्याचे दु:ख आहेच. मात्र चौथ्या स्थानापर्यंतची ही मजल फार प्रेरणादायी आहे,’’ असेही राणीने सांगितले.

हॉकी क्रमवारीत भारतीय पुरुष संघ तिसऱ्या, तर महिला आठव्या स्थानी

नवी दिल्ली : टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेतील ऐतिहासिक कामगिरीच्या बळावर भारतीय पुरुष आणि महिला दोन्ही संघांनी जागतिक हॉकी क्रमवारीत प्रत्येकी एक स्थानाने आगेकूच केली आहे. पुरुष संघाने तिसरे आणि महिला संघाने आठवे स्थान गाठले आहे. पुरुष संघाने ४१ वर्षांचा पदकाचा दुष्काळ संपवताना कांस्यपदक जिंकले, तर महिला संघाने चौथा क्रमांक मिळवला.

राणीकडून वंदनाच्या कुटुंबीयांची पाठराखण

टोक्यो : भारतीय हॉकी संघातील खेळाडू वंदना कटारियाच्या कुटुंबीयांवर जातीवाचक शेरेबाजी करणाऱ्या घटनेचा राणीने निषेध केला आहे. त्याशिवाय आरोपींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही तिने केली आहे. ‘‘देशाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी आम्ही सर्वस्व पणाला लावतो. त्यामुळे कोणत्याही खेळाडूवर अशा प्रकारची शेरेबाजी करणे फारच घृणास्पद आहे. आम्ही सर्व राणीच्या पाठी आहोत,’’ असे राणी म्हणाली.

Story img Loader