वरिष्ठ आशियाई कुस्ती स्पर्धा

भारताची आघाडीची कुस्तीपटू विनेश फोगट आणि अंशू मलिक यांनी शुक्रवारी वरिष्ठ आशियाई अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली. टोक्यो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेल्या या दोघींनी कारकीर्दीत प्रथमच या स्पर्धेत सुवर्णपदक मिळवण्याची किमया साधली. याव्यतिरिक्त दिव्या काकराननेसुद्धा सुवर्णपदक पटकावले, मात्र अनुभवी साक्षी मलिकला रौप्यावर समाधान मानावे लागले.

महिलांच्या ५३ किलो वजनी गटातील अंतिम लढतीत विनेशने चायनीज तैपईच्या मेंड सुआन-सेईवर ६-० असा विजय मिळवला. चीन आणि जपानच्या कुस्तीपटूंच्या अनुपस्थितीत २६ वर्षीय विनेशला रोखणे अवघड होते. त्यामुळे यापूर्वी आशियाई स्पर्धेत तीन वेळा रौप्यपदकावर समाधान मानणाऱ्या विनेशने अंतिम फेरीत एकही गुण न गमावता तांत्रिक गुणांआधारे सुवर्णपदक जिंकले.

हरयाणाच्या १९ वर्षीय अंशूने ५७ किलो वजनी गटाच्या अंतिम सामन्यात मोंगोलियाच्या बत्सेत अटसेगला ३-० असे नमवले. पंचांनी बत्सेतला विविध चुकांसाठी तीन वेळा ताकीद देऊनही तिचा खेळ न सुधारल्यामुळे अंशूला विजयी घोषित करण्यात आले. उपांत्य फे रीत अंशूने तांत्रिक गुणांच्या आधारे क्रमवारीत अग्रस्थानी असलेल्या उझबेकिस्तानच्या सेव्हारा एशमुराटोव्हाला पराभूत केले.

महिलांच्या ७२ किलो वजनी गटात दिव्याने कझाकस्तानच्या झामिला बर्गेनोव्हावर ८-५ अशी मात केली. दिव्याने सलग दुसऱ्यांदा या स्पर्धेत सुवर्णपदक प्राप्त केले. गतवर्षी दिव्याने ६८ किलो वजनी गटात अजिंक्यपद मिळवले होते.

साक्षीला मात्र ६५ किलो वजनी गटात मोंगोलियाच्या झोरिट्यन बोलोर्टनगलगकडून पराभव पत्करावा लागला. त्यामुळे भारताची सुवर्णपंचक साकारण्याची संधी हुकली. भारताच्या महिला कुस्तीपटूंनी स्पर्धेत सात पदके पटकावली असून यामध्ये चार सुवर्ण, एक रौप्य आणि दोन कांस्यपदकांचा समावेश आहे. गुरुवारी सरीता मोरने (५९ किलो) सुवर्णपदक जिंकले, तर सीमा बिस्ला (५० किलो) आणि पूजा (७६ किलो) यांनी कांस्यपदक मिळवले.

अंशू, सोनम यांचा ‘टॉप्स’मध्ये समावेश

नवी दिल्ली : टोक्यो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेल्या भारताच्या महिला कुस्तीपटू अंशू आणि सोनम मलिक यांसह चार नौकानयनपटूंचा लक्ष्य ऑलिम्पिक व्यासपीठ (टॉप्स) योजनेत समावेश करण्यात आला आहे. क्रीडा मंत्रालयाच्या ७ एप्रिल रोजी झालेल्या बैठकीदरम्यान ऑलिम्पिकपात्र खेळाडूंना ‘टॉप्स’मध्ये समावेश करण्याबाबत निर्णय घेण्यात आला. नेत्रा कुमानन, विष्णू सारवानन, गणपती चेंगप्पा, वरुण या नौकानयनपटूंनाही यामध्ये स्थान लाभले आहे. सध्या ११३ खेळाडूंना ‘टॉप्स’ योजनाचे लाभ मिळत आहे.

Story img Loader