मुंबई : पेट्रोलियम क्रीडा मंडळाने दादर येथील हालारी विसा ओसवाल समाज हॉल येथे सुरू असलेल्या ४९ व्या वरिष्ठ राष्ट्रीय अजिंक्यपद कॅरम स्पर्धेच्या आंतरसंस्था सांघिक दोन्ही गटांत अंतिम फेरी गाठली. पेट्रोलियम मंडळाने महिला गटात सेंट्रल सिव्हिल क्रीडा मंडळाचा २-१ असा पराभव केला, तर पुरुष गटात जैन इरिगेशनला ३-० असे हरवले.
महिलांमध्ये सेंट्रल सिव्हिल क्रीडा मंडळाच्या के. नागजोतीने पेट्रोलियम मंडळाच्या माजी विजेत्या रश्मी कुमारीचा २५-१७, १८-१३ असा सहज दोन गेममध्ये पराभव केला, तर पेट्रोलियमच्या काजल कुमारीने आर. विनिताला १९-१२, २५-५ असे हरवून बरोबरी साधली. मात्र पेट्रोलियमच्या एस. इलावझकी आणि परिमला देवी जोडीने गायत्री एस. व समिधा जाधव जोडीला २५-४, २५-५ असे पराभूत केले.
पुरुष गटात पेट्रोलियमच्या के. श्रीनिवासने जैन इरिगेशनच्या योगेश धोंगडेला २५-१२, २५-१८ असे हरवले, तर महम्मद घुफ्रानने अभिजित त्रीपनकरला २५-३, ३-१८, २१-८ अशी अटीतटीच्या लढतीत मात केली. यातील दुहेरीच्या सामन्यात योगेश परदेशी व रमेश बाबू जोडीने पंकज पवार व अनिल मुंढे जोडीला २५-१०, २०-१५ असे डोके वर काढू दिले नाही. प्रशांत मोरे व झहीर पाशाच्या जोरावर रिझव्‍‌र्ह बँकेने सेंट्रल क्रीडा मंडळाला ३-० असे हरवून अंतिम फेरी गाठली. तर महिलांमध्येही रिझव्‍‌र्ह बँकेने आयुर्विमा महामंडळाला २-१ असे हरवले. यात रिझव्‍‌र्ह बँकेच्या कविता सोमांचीने विश्वविजेत्या एस. अपूर्वावर २३-८, २२-३ असा विजय मिळवला.