क्रीडा, सौजन्य –
टेनिस क्षेत्रात ग्रँड स्लॅम स्पर्धाना अतिशय महत्त्वाचे स्थान असते. या स्पर्धामध्ये अव्वल दर्जाचे यश मिळविण्यासाठी बुजुर्ग खेळाडूंबरोबरच युवा खेळाडूही जोरदार प्रयत्न करीत असतात. अमेरिकन खुल्या स्पर्धेत यंदा रॅफेल नदाल, सेरेना विल्यम्स व लिअँडर पेस यांच्यासारख्या बुजुर्ग खेळाडूंनीच वर्चस्व गाजविले. अव्वल दर्जाचे यश मिळविताना वाढत्या वयाचा अडथळा येत नाही याचाच प्रत्यय त्यांनी दिला.
ग्रँड स्लॅम स्पर्धाच्या मालिकेत ऑस्ट्रेलियन, फ्रेंच, विम्बल्डन स्पर्धानंतर येणारी अमेरिकन स्पर्धा ही टेनिस मोसमातील अखेरची ग्रँड स्लॅम स्पर्धा असते. तसेच अन्य स्पर्धाच्या तुलनेत येथे घसघशीत पारितोषिक असल्यामुळेही येथे अजिंक्यपद मिळविण्यासाठी तुल्यबळ खेळाडूंमध्ये अहमहमिका दिसून येते. साहजिकच न्यूयॉर्क येथे होणाऱ्या या स्पर्धेद्वारे टेनिस चाहत्यांना अव्वल दर्जाच्या खेळाची मेजवानीच पाहावयास मिळत असते. अमेरिका हा पर्यटनासाठी आकर्षक देश असल्यामुळे टेनिसबरोबरच पर्यटनाचाही आनंद घेण्यासाठी परदेशाहून शेकडो लोक येथे येत असतात.
डावखुरा स्पॅनिश खेळाडू नदाल याने सर्वोत्तम खेळाचा प्रत्यय घडवीत पुरुष गटात अजिंक्यपद मिळविले. उत्कंठापूर्ण ठरलेल्या अंतिम लढतीत त्याने आपला पारंपरिक प्रतिस्पर्धी नोवाक जोकोविचचे आव्हान मोडून काढले. सेरेना विल्यम्सने घरच्या मैदानावर यंदा झंझावती खेळाचा प्रत्यय देत अजिंक्यपद पटकाविले. ३१ व्या वर्षीही अतिशय सफाईदार खेळ करीत तिने अंतिम सामन्यात चेक प्रजासत्ताकची खेळाडू व्हिक्टोरिया अझारेन्काला पराभूत केले.
भारताच्या दृष्टीने कौतुकाची गोष्ट म्हणजे चाळिशी ओलांडलेल्या पेसने राडेक स्टेपानेकच्या साथीत पुरुषांच्या दुहेरीत विजेतेपद मिळविले. आपण अजून फिट आहोत याचाच प्रत्यय त्याने दिला. पुरुष गटात विजेतेपदासाठी नदाल, जोकोविच, रॉजर फेडरर यांच्याबरोबरच अँडी मरेदेखील स्पर्धेत होता. गतवर्षी मरेने लंडन ऑलिम्पिकमध्ये ऐतिहासिक सुवर्णपदक जिंकल्यानंतर अमेरिकन स्पर्धा जिंकली होती. या विजेतेपदाबरोबरच त्याने ग्रँड स्लॅम अजिंक्यपदाचे स्वप्नही साकार केले होते. यंदा त्याने विम्बल्डन स्पर्धा जिंकून अमेरिकन स्पर्धेच्या विजेतेपदासाठी अपेक्षा उंचावल्या होत्या. त्याने उपांत्यपूर्व फेरीपर्यंत सातत्यपूर्ण खेळ केला होता. तथापि उपांत्यपूर्व फेरीत स्टानिस्लास वॉवरिंकच्या चतुरस्र खेळापुढे मरेची डाळ शिजली नाही. मरेला सव्‍‌र्हिस व परतीचे फटके यावर नियंत्रण ठेवता आले नाही. त्या तुलनेत वॉवरिंकने अतिशय अष्टपैलू खेळ केला. त्याने व्हॉलीज व फोरहँड फटक्यांचा बहारदार खेळ केला.
मरेपेक्षाही खराब कामगिरी यंदा फेडररने केली. चौथ्या फेरीतच त्याला पराभूत व्हावे लागले. टॉमी रॉब्रेडोने त्याचे आव्हान संपुष्टात आणले. कारकिर्दीत सतरा ग्रँड स्लॅमजिंकणाऱ्या फेडररचा करिश्मा संपत आला आहे की काय अशीच शंका त्याच्या चाहत्यांना येऊ लागली आहे. विम्बल्डन स्पर्धेत दुसऱ्या फेरीतच तो गारद झाला होता. अन्य एटीपी स्पर्धामध्येही त्याची कामगिरी निराशाजनक झाली आहे. खेळाच्या दृष्टीने तो आता प्रौढ खेळाडू वाटू लागला आहे. नेहमीच्या शैलीप्रमाणे तो आता परतीचे वेगवान फटके मारू शकत नाही. बेसलाइनवरूनही फटकेबाजी करू शकत नाही, असे दिसून येऊ लागले आहे. कारकिर्दीत व लोकप्रियतेमध्ये सर्वोच्च स्थानावर असताना निवृत्ती घेणे योग्य मानले जाते. फेडररने निवृत्ती स्वीकारण्याची वेळ आली आहे काय याचा बारकाईने अभ्यास केला पाहिजे.
नदालला गतवर्षी या स्पर्धेत दुखापतीमुळे भाग घेता आला नव्हता. यंदा त्याने विजेतेपद मिळविण्याच्याच निश्चयाने या स्पर्धेत भाग घेतला. उपांत्य फेरीत त्याने रिचर्ड गास्केटवर मात केली. सरळ तीन सेट्समध्ये त्याने हा सामना जिंकला. त्या तुलनेत जोकोविचला उपांत्य लढतीत वॉवरिंकविरुद्ध विजय मिळविताना झगडावे लागले. पाच सेट्सपर्यंत झालेला हा सामना टेनिस चाहत्यांसाठी खेळाचा निखळ आनंद देणारा ठरला. मरेला नमविताना वॉवरिंकने जो अव्वल दर्जाचा खेळ केला होता, तसाच खेळ त्याने जोकोविचविरुद्ध केला. मरेच्या पाठोपाठ जोकोविचलाही वॉविरक पराभूत करणार की काय अशी शंका निर्माण झाली होती. तथापि जोकोविच हा अतिशय जिगरबाज खेळाडू मानला जातो. त्याने शेवटपर्यंत संयमी खेळ करीत वॉवरिंकची जणू काही परीक्षाच पाहिली.
जोकोविच व नदाल या दोन सिंहांमधील लढतीविषयी कमालीची उत्सुकता निर्माण झाली होती. मात्र अपेक्षेपेक्षा या सामन्यात नदालने सर्वोत्तम खेळ केला. केवळ एकच सेट त्याने गमावला. त्यामध्ये जोकोविचला नदालच्या नकारात्मक खेळाचाच अधिक फायदा झाला होता. हा सामना त्याने ३-१ अशा सेट्सने घेत या स्पर्धेतील दुसरे अजिंक्यपद मिळविले. नदालच्या वेगवान खेळापुढे जोकोविचच्या खेळातील मर्यादा स्पष्ट झाल्या. नदालने या सामन्यात फोरहँडचे ताकदवान फटके, नेटजवळून प्लेसिंग, बेसलाइनवरून व्हॉलीज असा अष्टपैलू खेळ केला. त्याच्या खेळापुढे जोकोविच निरुत्तर ठरला. आठ वेळा फ्रेंच स्पर्धाजिंकणाऱ्या नदालने आपली ग्रँड स्लॅम विजेतेपदांची संख्या तेरावर नेली आहे.
महिलांमध्ये सेरेनाची कामगिरी अतिशय अफलातून झाली. तिने अंतिम फेरीत धडक मारताना सातत्याने वेगवान खेळ केला होता. ऑस्ट्रेलियन स्पर्धेत स्लोएनी स्टीफन्सविरुद्ध तिला पराभव स्वीकारावा लागला होता. या पराभवाची परतफेड येथे तिने सरळ दोन सेट्समध्ये केली. उपांत्यपूर्व फेरीत तिने कार्ला नॅव्हेरोचा ६-०, ६-० असा धुव्वा उडविला. हा निकालच सेरेनाच्या अतुलनीय खेळाचा प्रत्यय आहे. उपांत्य लढतीत तिच्यापुढे चीनची अनुभवी खेळाडू ली ना हिचे आव्हान होते. हा सामनादेखील तिने एकतर्फी जिंकला. संपूर्ण सामन्यात तिने केवळ तीनच गेम्स गमावल्या. यावरूनच सेरेनाच्या खेळातील नजाकत  स्पष्ट होते.
उपांत्य फेरीच्या अन्य लढतीत अझारेन्काने फ्लेविया पेनेट्टाला सहज हरविले. अंतिम फेरीत सेरेनाचेच वर्चस्व राहणार अशी शक्यता होती, तरीही अझारेन्काकडून तिला कडवी लढत मिळेल असा अंदाज होता आणि तो खराही ठरला. बेलारुसची खेळाडू अझारेन्काने तीन सेट्सपर्यंत सेरेनाला झुंजविले. तिसऱ्या सेटमध्ये तिची दमछाक झाली. घरचे मैदान, अनुकूल वातावरण व प्रेक्षकांचा पाठिंबा ही सेरेनाची जमेची बाजू होती. हीच बाजू निर्णायक ठरली. हा सामना पावणेतीन तास चालला होता. स्पर्धेच्या अंतिम लढतीमधील हा सर्वात जास्त वेळ चाललेला सामना होता. सेरेनाने हा सामना जिंकून कारकिर्दीतील पाचवे अमेरिकन अजिंक्यपद मिळविले. एकाच वर्षी फ्रेंच व अमेरिकन या दोन्ही स्पर्धा जिंकणारी ती दुसरी खेळाडू आहे. यापूर्वी २००७ मध्ये जस्टीन हेनिनने ही कामगिरी केली होती. तिचे हे सतरावे ग्रँड स्लॅम अजिंक्यपद आहे. या स्पर्धेतील सर्वात वयस्कर विजेती खेळाडू होण्याचा पराक्रमही तिने केला. सेरेनाची बहीण व्हिनसला यंदा सपशेल निराशा पाहावयास मिळाली. खेळाच्या दृष्टीने तिचा प्रभाव संपत आला आहे. ती निवृत्तीच्या उंबरठय़ावरच आहे असे मानले जात आहे.
लंडन ऑलिम्पिकसाठी भारतीय संघात पेसचा समावेश केल्यानंतर महेश भूपतीसह अनेक खेळाडूंनी निवड समितीवर तोंडसुख घेतले होते. पेसला लंडन ऑलिम्पिकमध्ये पदक मिळविता आले नाही तरी त्याने अतिशय कौतुकास्पद कामगिरी केली होती. अमेरिकन स्पर्धेत त्याने स्टेपानेकच्या साथीत विजेतेपद पटकाविले. विजेतेपदानंतर पेसने व्यक्त केलेली प्रतिक्रिया खरोखरीच बोलकी आहे. तो म्हणाला मी माझ्या वयाचे आकडे मोजत नाही. कॅलेंडरमधील त्या तारखेकडे पाहतो व फक्त स्मितहास्य करतो. असे केले की मला आपोआपच सामने खेळण्यासाठी प्रोत्साहन मिळते. १९९६ मध्ये अमेरिकेतील अटलांटा येथे झालेल्या ऑलिम्पिकमध्ये पेसने एकेरीत कांस्यपदक मिळविले. भारतास आजपर्यंत टेनिसमध्ये मिळालेले ते एकमेव ऑलिम्पिक पदक आहे. त्या वेळी पेसने दाखविलेला उत्साह अजूनही कायम आहे. खरोखरीच पेस म्हणजे भारतीय टेनिसमधील उत्साहाचा अखंड झरा आहे. त्याने स्टेपानेकच्या साथीत अिजक्यपद मिळविताना बॉब व माइक या ब्रायन बंधूंवरही खळबळजनक विजय नोंदविला होता. गतवर्षी त्याने स्टेपानेकच्या साथीत ऑस्ट्रेलियन स्पर्धेत दुहेरीचे विजेतेपद मिळविले होते. पेसने आतापर्यंत अमेरिकन स्पर्धेतील दुहेरीत तीन वेळा अजिंक्यपद मिळविले आहे. कारकिर्दीत त्याचे हे आठवे ग्रँड स्लॅम विजेतेपद आहे. पेसने आपल्या कामगिरीनेच टीकाकारांची तोंडे बंद केली आहेत. लोकांनी कितीही आगपाखड केली तरी पेस त्याकडे दुर्लक्षच करतो. केवळ टेनिसवरच तो लक्ष केंद्रित करीत असतो.
चेक प्रजासत्ताकची खेळाडू आंद्रिया लिव्हाकोवाने महिला दुहेरी व मिश्र दुहेरी या दोन्ही गटांत विजेतेपद मिळवित दुहेरी मुकूट मिळविला. २७ वर्षीय खेळाडू आंद्रियाने ल्युसी ऱ्हादेकाच्या साथीत महिलांच्या दुहेरीत अजिंक्यपद मिळविले. तसेच तिने मॅक्स मिर्नयीच्या साथीत मिश्रदुहेरीत विजेतेपद पटकाविले. एकेरीपेक्षा दुहेरीवरच जास्त लक्ष केंद्रित करताना आंद्रियाने आपल्या अष्टपैलू खेळाचा प्रत्यय या स्पर्धेत दाखविला.
ऑस्ट्रेलियन खुली स्पर्धा नवीन वर्षांच्या सुरुवातीला आयोजित केली जाते. या स्पर्धेसाठी अजून भरपूर कालावधी आहे. दुखापतीमुळे अमेरिकन स्पर्धेत सहभागी न झालेल्या मारिया शारापोवासारख्या इतर अनेक खेळाडूंना तंदुरुस्त होण्याकरिता बराच वेळ मिळणार आहे. त्याचप्रमाणे अपयशाच्या बॅडपॅचमधून जाणाऱ्या फेडररसारख्या खेळाडूंना आपल्या खेळातील चुका कमी करण्यासाठी चांगली संधी आहे. पुढच्या ग्रँड स्लॅमपूर्वी हे खेळाडू सरावावर लक्ष केंद्रित करतील व नव्या जोमाने नवीन वर्षी ग्रँड स्लॅम स्पर्धेत भाग घेतील अशी आशा आहे. पेस याच्याकडून स्फूर्ती घेत सोमदेव देववर्मन, रोहन बोपण्णा यांच्यासारख्या युवा खेळाडूंनी भारताची पताका ग्रँड स्लॅम स्पर्धामध्ये कशी उंचावली जाईल याचा बारकाईने विचार केला पाहिजे. पेसच्या नावाने खडे फोडण्याऐवजी तो अजूनही अव्वल दर्जाचा खेळ कसा करतो याचे आत्मपरीक्षण करीत भारताच्या युवा खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्वोत्तम कामगिरी करावी अशीच अपेक्षा आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा