स्वित्र्झलडच्या मार्टिना हिंगिसने जागतिक क्रमवारीत महिला दुहेरीचे अव्वल स्थान पटकावले. २०१६मध्ये दोन जेतेपद पटकावून मार्टिनाने ११ हजार ३९५ गुणांसह ही मजल मारली. महिला दुहेरीतील जोडीदार सानिया मिर्झासह हिंगिसही अव्वल स्थानावर विराजमान झाली आहे.
२०१५च्या हंगामातील धमाकेदार कामगिरीच्या पुनरावृत्तीच्या दिशेने कूच करताना मार्टिना-सानिया जोडीने ब्रिस्बेनपाठोपाठ आपिया आंतरराष्ट्रीय स्पध्रेचे जेतेपद पटकावले. या जोडीचे २०१६ मधील दुसरे, तर एकूण अकरावे जेतेपद ठरले. या जोडीने सलग ३० सामन्यांत अपराजित राहण्याचा विक्रमही केला. सानियानेही आनंद व्यक्त केला आहे. ती म्हणाली, ‘‘हिंगिससाठी मी खूप आनंदित आहे. १६ वर्षांनंतर तिने अव्वल स्थानावर झेप घेतली आहे. आमची जोडी जगातील अव्वल जोडी आहे. त्यामुळे आता केवळ संघ म्हणून नव्हे, तर वैयक्तिकआम्ही दोघीही अव्वल स्थानावर विराजमान झाल्याचा अधिक आनंद आहे. कामगिरीत सातत्य राखण्याचे आमचे लक्ष्य आहे.’’
सानियासह जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर विराजमान होण्याचा आंनद निराळाच आहे. हे माझे लक्ष्य होते आणि सानियासह ते पूर्ण करण्याची संधी मला मिळाली. चार्लस्टन येथील स्पध्रेनंतर सानियाने अव्वल स्थान पटकावले होते आणि त्या वेळी हा जणू माझाच गौरव असल्याचे मला वाटले होते.
मार्टिना हिंगिस