भ्रष्टाचाराचे आरोप, पद रिक्त करण्याची होत असलेली मागणी, विरोधात होत असलेली निदर्शने या साऱ्यांचा कणभरही परिणाम न होऊ देता सेप ब्लाटर यांनी फिफावरचे आपले संस्थान कायम राखले. दिवसभर झालेल्या वाद-विवादांनंतरही आणि अमेरिकेसारखी महासत्ता विरोधात असतानाही मतदारांनी ब्लाटर यांच्यावर विश्वास कायम ठेवत सलग पाचव्यांदा अध्यक्षपदाची माळ त्यांच्या गळ्यात घातली. अध्यक्षपदासाठी त्यांच्याविरोधात उभ्या राहिलेल्या प्रिन्स अली बिन अल-हुसेन यांनी पहिल्या फेरीनंतर अनपेक्षित माघात घेतली आणि ब्लाटर यांनी १३३- ७३ अशा मतांनी अध्यक्षपद आपल्याकडे राखण्यात यश मिळवले. ब्लाटर यांच्या या विजयाने युरोपियन देश विश्वचषक स्पध्रेतून माघार घेण्याची शक्यता बळावली आहे.
स्विस आणि अमेरिकन पोलिसांनी भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली फिफाच्या नऊ अधिकाऱ्यांना अटक केल्यानंतर ब्लाटर यांनी जबाबदारी स्वीकारुन पदावरून पायउतार व्हावे अशा मागणीने जोर धरला होता. मात्र, ब्लाटर यांनी अध्यक्षदाच्या निवडणुकीत एकहाती वर्चस्व गाजवत बाजी मारली.
 ७९ वर्षीय ब्लाटर १९९८ पासून अध्यक्षपदावर विराजमान आहेत. परंतु, यंदाची निवडणुक त्यांच्यासाठी प्रतिष्ठेची बनली होती. फिफा पदाधिकाऱ्यांच्या बैठकीच्या दोन दिवसआधीच स्विस आणि अमेरिकन पोलिसांनी केलेल्या कारवाईत फिफाच्या नऊ अधिकाऱ्यांसह १४ जणांना भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. हा भ्रष्टाचार ब्लाटर यांच्या नेतृत्वाखाली झाला असल्याचा सूर आवळून विरोधकांनी त्यांच्या हाकलपट्टीची मागणी केली आणि त्यामुळेच या निवडणकुीत काय होते याकडे सर्वाचे लक्ष्य लागले होते. भारतीय वेळेनुसार एक वाजता दुसऱ्या बैठकीला सुरुवात झाली. ब्लाटर यांनी अध्यक्षीय भाषणात चार वर्षांचा लेखाजोखा मांडला आणि फिफाची मलिन झालेली प्रतिमा सुधारण्यासाठी सर्वाच्या सहकार्याची मागणी केली. याचवेळी पॅलेस्टियन निदर्शकांनी त्यांच्याविरोधात घोषणाबाजी केली. बैठकीस्थळी बॉम्ब असल्याच्या अफवेने वातावरणातील गांर्भीय आणखीन वाढवले.
या सर्व नाटय़मय घडमोडीनंतर मतदानाला सुरुवात झाली. २०६ सदस्यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या निवडणूकीत पहिल्या फेरीत ब्लाटर यांना १३३, तर प्रिन्स अली यांना ७३ मते पडली. स्पष्ट बहुमतासाठी आवश्यक असलेल्या दोनतृतीयांश मतापेक्षा ७ मते कमी पडल्याने निकाल दुसऱ्या फेरीकडे सरकला. मात्र, प्रिन्स अली यांनी अनपेक्षित माघार घेतल्याने ब्लाटर यांचा बिनविरोध विजय झाला.
फिफामधील कारकीर्द
*१९७५ ते ८१ या कालावधीत त्यांना तांत्रिक अधिकारी म्हणून काम पाहिले.
*१९८१ ते ९८ या कालावधीत ब्लाटर यांनी सह सचिवपदाचा कारभार संभाळला.
*८ जून १९९८ मध्ये ब्लाटर यांची पहिल्यांदा फिफाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली.
*२००२मध्ये पुन्हा त्यांना अध्यक्षपदाचा पदभार संभाळण्याची संधी मिळाली
*२००७ मध्ये २०७ पैकी केवळ ६६ मते पडूनही त्यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली
*कतारला २०२२च्या विश्वचषकाचे यजमानपद देण्यासाठी ब्लाटर यांनी आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप
सर्वप्रथम मी सर्वाचे अभिनंदन करू इच्छितो आणि प्रिन्स अली यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो. ते कडवे प्रतिस्पर्धी होते आणि त्यांनी चांगली झुंज दिली. आणखी चार वर्षांकरीता माझा स्वीकार करण्यासाठी धन्यवाद. अध्यक्षपदाचा कालावधी संपेपर्यंत मी फिफाला यशोशिखरावर पोहचवण्याचे आश्वासन देतो.
– सेप ब्लाटर, फिफाचे अध्यक्ष

बॉम्बची अफवा
शुक्रवारी पार पडलेल्या फिफाच्या बैठकीत बॉम्बच्या अफवेने एकच खळबळ उडवली. स्विस पोलिसांना बॉम्ब असल्याची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि शोधमोहीम राबवली; परंतु ही अफवा असल्याचे तपासाअंती निष्पन्न झाले.

इंग्लंडची विश्वचषकातून माघार?
लंडन : सेप ब्लाटर पुन्हा अध्यक्षपदावर निवडून आल्यास २०१८व्या विश्वचषक स्पध्रेवरील बहिष्काराला इंग्लंडचा पाठिंबा असेल, असे मत इंग्लंड फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष ग्रेग डिक यांनी व्यक्त केले होते. मात्र, निवडणूकीच्या निकालानंतर ते काय नेमकी भूमिका घेतात, याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. युरोपियन देशांनी माघार घेतल्यास ३२ पैकी १३ देश विश्वचषकातून बाहेर होतील.  फिफा बैठकीपूर्वी बीसीसी रेडिओशी बोलताला डिक म्हणाले, ‘‘इंग्लंड एकटा नाही. संपूर्ण युरोपियन देश बहिष्काराच्या पवित्र्यात आहेत. संपूर्ण युरोप महासंघांनी तसा निश्चय केल्यास वावगे ठरणार नाही. फिफा त्या देशांशिवाय स्पर्धा घेतील आणि त्या देशांच्या प्रेक्षकांवर तो अन्याय असेल, परंतु यूईएफएने संघटितपणे विरोध केल्यास आमचाही त्यांना पाठिंबा असेल.’’

Story img Loader