दोहा : ब्राझीलला विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत अपराजित्व राखण्यात अपयश आले. अखेरच्या साखळी सामन्यात कॅमेरुनने भरपाई वेळेतील गोलने ब्राझीलवर १-० असा ऐतिहासिक विजय मिळवला. ब्राझीलवर विजय मिळवणारा कॅमेरुन पहिलाच आफ्रिकन संघ ठरला. ग-गटातील या निकालाचा फारसा परिणाम गुणतक्त्यात पडला नाही. ब्राझीलने गटात अव्वल स्थान कायम राखले. गटातील अन्य लढतीत स्वित्झर्लंडने सर्बियावर ३-२ अशी सरशी साधत बाद फेरी गाठली.
स्वित्झर्लंडने २०व्या मिनिटालाच अनुभवी आक्रमकपटू झार्डान शकिरीच्या गोलच्या जोरावर आघाडी मिळवली. अॅलेक्झांडर मित्रोव्हिचने (२६व्या मिनिटाला) हेडर मारून गोल केल्याने सर्बियाने बरोबरी साधली. त्यानंतर डुसान व्लाहोव्हिचने (३५व्या मि.) गोल करून सर्बियाला आघाडी मिळवून दिली. मध्यंतराला एक मिनिट शिल्लक असताना ब्रील एम्बोलोने स्वित्झर्लंडला बरोबरी साधून दिली. त्यानंतर उत्तरार्धाच्या सुरुवातीलाच रुबेन व्हर्गासने चेंडूचा ताबा मिळवून रेमो फ्रुएलेररकडे पास दिला आणि त्याने या संधीचा फायदा घेत स्वित्झर्लंडला आघाडीवर नेले.
भरपाई वेळेतील गोल निर्णायक
त्याच वेळी दुसरीकडे ब्राझील आणि कॅमेरुन यांच्यातील खेळ कमालीचा वेगवान झाला. ब्राझीलने चेंडूवर अधिक वेळ ताबा मिळवला, पण कॅमेरुनने प्रतिआक्रमण करताना ब्राझीलला अडचणीत टाकले. अखेर सामन्याच्या भरपाई वेळेतील दुसऱ्या मिनिटाला कर्णधार व आघाडीपटू विन्सेन्ट अबुबाकारने गोल नोंदवत कॅमेरुनला विजय मिळवून दिला.