विम्बल्डनच्या ग्रास कोर्टवर आपली हुकमत टिकविण्यात अग्रमानांकित सेरेना विल्यम्स हिला येथे तिसऱ्या फेरीत अपयश आले. मात्र मारिया शारापोवा व रॉजर फेडरर या माजी विजेत्या खेळाडूंनी विम्बल्डन टेनिस स्पर्धेतील एकेरीत आगेकूच राखली. भारताच्या लिअँडर पेस याने चेक प्रजासत्ताकच्या राडेक स्टेपानेक याच्या साथीत पाच सेट्च्या झुंजीनंतर विजय मिळविला.
माजी विजेत्या सेरेना हिला २५ व्या मानांकित अॅलिझी कॉर्नेट हिने १-६, ६-३, ६-४ असे पराभूत करीत सनसनाटी विजय मिळविला. सेरेना हिने सफाईदार खेळ करीत पहिला सेट सहज घेतला. मात्र त्यानंतर कॉर्नेट हिने फोरहँडच्या बहारदार फटक्यांचा उपयोग केला. या सामन्याचे वेळी आलेल्या पावसाच्या व्यत्ययामुळे सेरेनाच्या खेळातील लय बिघडली. तिच्या हातून चुका होत गेल्या व सामनाही तिने गमावला. माजी विजेती शारापोवा हिने अमेरिकेची अॅलिसन रिस्की हिच्यावर ६-३, ६-० असा दणदणीत विजय मिळवित चौथ्या फेरीकडे वाटचाल केली.
चौथ्या मानांकित फेडररने कोलंबियाच्या सॅन्टियागो गिराल्डो याचा ६-३, ६-१, ६-३ असा धुव्वा उडविला.
पेसचा संघर्षपूर्ण विजय
दुहेरीत पेस व स्टेपानेक या पाचव्या मानांकित जोडीने तीन तासांच्या लढतीनंतर सॅन्टियागो गोन्झालेस आणि स्कॉट लिपस्की जोडीला ३-६, ६-१, ३-६, ६-३, ११-९ असे नमवत तिसरी फेरी गाठली.
सानिया मिर्झा पराभूत
भारताच्या सानिया मिर्झा हिला महिलांच्या दुहेरीत पराभवाला सामोरे जावे लागले. सानिया व तिची सहकारी कारा ब्लॅक (झिम्बाब्वे) यांना अॅनास्ताशिया पावलिचेन्कोवा (रशिया) व ल्युसी साफारोवा (चेक प्रजासत्ताक) यांनी २-६, ७-६ (९-७), ६-४ असे हरविले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा