गतविजेती सेरेना विल्यम्स, चीनची ली ना आणि ऑस्ट्रेलियाची समंथा स्टोसूर यांनी आपापले सामने जिंकत विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या महिला एकेरीतील तिसऱ्या फेरीत मजल मारली आहे. पुरुषांमध्ये अर्जेटिनाचा जुआन मार्टिन डेल पोट्रो आणि जपानचा केई निशिकोरी यांनीही आगेकूच केली आहे.
धक्कादायक निकाल आणि दिग्गज खेळाडूंच्या माघारीमुळे विम्बल्डन स्पर्धेचा तिसरा दिवस गाजला होता. पण शुक्रवारी अमेरिकेच्या सेरेनाने फ्रान्सच्या कॅरोलिन गार्सिया हिचे आव्हान सहजपणे ६-३, ६-२ असे मोडून काढले. एक तास आणि सात मिनिटे रंगलेल्या या सामन्यात विजय मिळवून सेरेनाने सलग ३३व्या विजयाची नोंद केली. तिला पुढील फेरीत जपानच्या किमिको डेट-क्रम हिच्याशी लढत द्यावी लागेल. किमिकोने रोमानियाच्या अलेक्झांड्रा कडान्टू हिला ६-४, ७-५ असे पराभूत केले. चीनच्या ली ना हिला रोमानियाच्या सिमोना हलेप हिचा पराभव करण्यासाठी संघर्ष करावा लागला. अखेर ली ना हिने ६-२, १-६, ६-० असा विजय प्राप्त केला. ऑस्ट्रेलियाच्या १४व्या मानांकित समंथा स्टोसूरने रशियाच्या ओल्गा पुचकोव्हा हिच्यावर ६-२, ६-२ अशी सहज मात केली.
२०१०मध्ये विम्बल्डनची अंतिम फेरी गाठणारा टॉमस बर्डिच आणि २००९मध्ये अमेरिकन ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकणाऱ्या जुआन मार्टिन डेल पोट्रो यांनी पुरुषांमध्ये विजयी घोडदौड राखली आहे. झेक प्रजासत्ताकच्या बर्डिचने जर्मनीच्या डॅनियल ब्रँड्स याला ७-६ (८/६), ६-४, ६-२ अशी धूळ चारली. डेल पोट्रोने कॅनडाच्या जेसी लेव्हिन याला ६-२, ७-६ (९/७), ६-३ असे पराभूत केले. जपानच्या निशिकोरीने अर्जेटिनाच्या लिओनाडरे मेयर याच्यावर ७-६ (७/५), ६-४, ६-२ असा विजय मिळवला. अमेरिकेच्या जेम्स ब्लॅकला ऑस्ट्रेलियाच्या
बर्नार्ड टॉमिककडून पराभवाचा धक्का सहन करावा लागला. टॉमिकने ६-३, ६-४, ७-५ असा
विजय साकारला.

मी अजून संपलेलो नाही -फेडरर
लंडन : विम्बल्डनच्या दुसऱ्याच फेरीत गाशा गुंडाळावा लागल्यानंतर रॉजर फेडररच्या भवितव्याबाबत उलटसुलट चर्चेला उधाण आले होते. पण मी अजून संपलेलो नाही. अजून काही वर्षे मी टेनिस खेळत राहणार आहे, असे सांगत १७ ग्रँड स्लॅम जेतेपदांना गवसणी घालणाऱ्या फेडररने या चर्चेला पूर्णविराम दिला. ‘‘अजून माझ्यात बरेच टेनिस शिल्लक आहे. यापुढे काही वर्षे टेनिस खेळत राहण्यासाठी मी योजना आखल्या आहेत. ३६ ग्रँड स्लॅम स्पर्धामध्ये मी किमान उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारली आहे. हा आकडा नक्कीच अभिमानास्पद आहे. युक्रेनच्या सर्जी स्टॅखोव्हस्कीकडून दुसऱ्याच फेरीत पराभूत झाल्यानंतर मी निराश झालो नाही. त्याउलट क्रमवारीतील खालच्या क्रमांकाचे खेळाडू दिग्गज टेनिसपटूंना पराभूत करत आहेत, हे टेनिसमध्ये होत असलेले बदल सुखावह आहेत. त्यामुळे जेतेपदासाठी मला अधिक मेहनत घ्यावी लागणार, हे स्पष्ट झाले,’’ असे स्वित्र्झलडच्या फेडररने ६-७ (५/७), ७-६ (७/५), ७-५, ७-६ (७/५) असे पराभूत झाल्यानंतर सांगितले.

विम्बल्डनच्या निसरडय़ा कोर्टबाबत शारापोव्हाला तोडगा हवा!
लंडन : विम्बल्डनच्या निसरडय़ा कोर्टवर पडून जायबंदी झाल्यामुळे स्पर्धेच्या तिसऱ्याच दिवशी अनेक टेनिसपटूंना माघार घ्यावी लागली. दुसऱ्या फेरीत तीन वेळा कोर्टवर घसरून पडल्यामुळे पराभवाचा धक्का सहन करावा लागलेल्या रशियाच्या मारिया शारापोव्हाने ‘विम्बल्डनच्या प्रमुख कोर्टवर खेळाडूंना स्पर्धेआधी सराव करण्याची परवानगी हवी,’ अशी मागणी केली आहे. ती म्हणाली, ‘‘सेंटर कोर्ट तसेच पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाच्या कोर्टवर खेळाडूंना स्पर्धेआधी काही दिवस सराव करण्याची परवानगी द्यायला हवी. कोर्टशी सुसंगत झाल्यावर खेळाडूंना दुखापतीचे प्रमाण टाळता येईल.’’

Story img Loader