गतविजेती सेरेना विल्यम्स, चीनची ली ना आणि ऑस्ट्रेलियाची समंथा स्टोसूर यांनी आपापले सामने जिंकत विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या महिला एकेरीतील तिसऱ्या फेरीत मजल मारली आहे. पुरुषांमध्ये अर्जेटिनाचा जुआन मार्टिन डेल पोट्रो आणि जपानचा केई निशिकोरी यांनीही आगेकूच केली आहे.
धक्कादायक निकाल आणि दिग्गज खेळाडूंच्या माघारीमुळे विम्बल्डन स्पर्धेचा तिसरा दिवस गाजला होता. पण शुक्रवारी अमेरिकेच्या सेरेनाने फ्रान्सच्या कॅरोलिन गार्सिया हिचे आव्हान सहजपणे ६-३, ६-२ असे मोडून काढले. एक तास आणि सात मिनिटे रंगलेल्या या सामन्यात विजय मिळवून सेरेनाने सलग ३३व्या विजयाची नोंद केली. तिला पुढील फेरीत जपानच्या किमिको डेट-क्रम हिच्याशी लढत द्यावी लागेल. किमिकोने रोमानियाच्या अलेक्झांड्रा कडान्टू हिला ६-४, ७-५ असे पराभूत केले. चीनच्या ली ना हिला रोमानियाच्या सिमोना हलेप हिचा पराभव करण्यासाठी संघर्ष करावा लागला. अखेर ली ना हिने ६-२, १-६, ६-० असा विजय प्राप्त केला. ऑस्ट्रेलियाच्या १४व्या मानांकित समंथा स्टोसूरने रशियाच्या ओल्गा पुचकोव्हा हिच्यावर ६-२, ६-२ अशी सहज मात केली.
२०१०मध्ये विम्बल्डनची अंतिम फेरी गाठणारा टॉमस बर्डिच आणि २००९मध्ये अमेरिकन ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकणाऱ्या जुआन मार्टिन डेल पोट्रो यांनी पुरुषांमध्ये विजयी घोडदौड राखली आहे. झेक प्रजासत्ताकच्या बर्डिचने जर्मनीच्या डॅनियल ब्रँड्स याला ७-६ (८/६), ६-४, ६-२ अशी धूळ चारली. डेल पोट्रोने कॅनडाच्या जेसी लेव्हिन याला ६-२, ७-६ (९/७), ६-३ असे पराभूत केले. जपानच्या निशिकोरीने अर्जेटिनाच्या लिओनाडरे मेयर याच्यावर ७-६ (७/५), ६-४, ६-२ असा विजय मिळवला. अमेरिकेच्या जेम्स ब्लॅकला ऑस्ट्रेलियाच्या
बर्नार्ड टॉमिककडून पराभवाचा धक्का सहन करावा लागला. टॉमिकने ६-३, ६-४, ७-५ असा
विजय साकारला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा