जागतिक क्रमवारीत अव्वलस्थानी असलेल्या सेरेना विल्यम्सने इंडियाना वेल्स चषक टेनिस स्पर्धेत जेतेपद मिळविण्याच्या दिशेने आगेकूच केली. तिने तिसऱ्या फेरीत युलिया पुतिन्त्सेवा हिच्यावर ७-६ (७-२), ६-० अशी मात केली. सेरेनाने यापूर्वी या स्पर्धेत १९९९ व २००१ विजेतेपद मिळविले असले तरी गेल्या पंधरा वर्षांमध्ये तिला अजिंक्यपदाने हुलकावणी दिली आहे. सेरेनाला पहिल्या सेटमध्ये झगडावे लागले. टायब्रेकरद्वारा तिने हा सेट घेतला. दुसऱ्या सेटमध्ये मात्र सेरेना हिने केलेल्या चतुरस्र खेळापुढे युलिया हिला एकही सव्‍‌र्हिस राखता आली नाही. सेरेना हिला चौथ्या फेरीत कॅटरिना बोन्दोरेन्को हिच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. बोन्दारेन्कोने लेसिया त्सुरेन्को हिच्यावर ३-६, ६-४, ७-६ (९-७) असा निसटता विजय मिळविला. या स्पर्धेत एकाही खेळाडूला तीन वेळा विजेतेपद मिळविता आलेले नाही. सेरेनाला हा विक्रम करण्याची संधी आहे. जागतिक क्रमवारीतील तृतीय मानांकित खेळाडू अ‍ॅग्निझेस्का राडवानस्काने रुमानियाच्या मोनिका निकुलेस्कु हिचा ६-२, ६-१ असा दणदणीत पराभव करीत चौथी फेरी गाठली.
पुरुष गटात जपानच्या केई निशिकोरीने कझाकिस्तानच्या मिखाईल कुकुश्किनचे आव्हान ६-३, ६-३ असे संपुष्टात आणले. जो विल्फ्रेड त्सोंगाने आपलाच सहकारी व्हिन्सेंट मिलोटवर ७-५, ६-१ अशी मात केली. डॉमिनिक थिएमने जोझेफ कोव्हालिकचा ७-६ (७-४), ७-६ (७-३) असा पराभव केला, तर सॅम क्विएरीने थिमको डीबेकेरला ७-६ (७-५), ६-४ असे नमवले.

Story img Loader