सेरेना विल्यम्स व अँडी मरे यांनी ब्रिस्बेन ओपन टेनिस स्पर्धेतील अनुक्रमे महिला व पुरुष गटात विजेतेपद मिळवत आगामी ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेबाबत आपल्या अपेक्षा उंचावल्या.
सेरेना या अमेरिकन खेळाडूने झंझावाती खेळाची मालिका कायम ठेवताना अनास्ताशिया पॅव्हेलीचेन्कोवा हिच्यावर ६-२, ६-१ असा दणदणीत विजय मिळविला. तिने फोरहँडच्या ताकदवान फटक्यांचा लीलया उपयोग करीत आपल्या प्रतिस्पर्धी खेळाडूस फारशी संधी दिली नाही. तसेच तिने नेटजवळून प्लेसिंगचाही सुरेख खेळ केला. सेरेना हिने २०११ मध्ये अमेरिकन ओपन स्पर्धेत समंथा स्टोसूरकडून पराभव स्वीकारला होता. त्यानंतर तिने महत्त्वाच्या स्पर्धामध्ये पराभव पाहिलेलाच नाही. तिने येथील विजेतेपदासह सलग आठवे अजिंक्यपद मिळविले.
पुरुष गटात अँडी मरे यानेही विजयी मालिका कायम ठेवीत विजेता होण्याचा मान मिळविला. त्याने ग्रिगोर दिमित्रोव्ह याच्यावर ७-६ (७-०), ६-४ असा विजय मिळविला. टायब्रेकरमध्ये मरे याने ग्रिगोरला पूर्णपणे निष्प्रभ केले. दुसऱ्या सेटमध्ये त्याने क्रॉसकोर्ट फटक्यांचा उपयोग करीत सव्‍‌र्हिसब्रेक मिळविला.
मरे याने गतवर्षी ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा व त्यापाठोपाठ अमेरिकन ओपन स्पर्धेत विजेतेपद मिळविले होते.

Story img Loader