जेतेपदाचे प्रबळ दावेदार असलेल्या नोव्हाक जोकोव्हिच आणि सेरेना विल्यम्स यांनी अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत विजयी सलामी दिली. दुखापती आणि वाईट फॉर्मच्या ससेमिऱ्यात अडकलेल्या राफेल नदालला विजयासाठी संघर्ष करावा लागला. महिलांमध्ये अ‍ॅना इव्हानोव्हिक तर पुरुषांमध्ये केई निशिकोरी या मानांकित खेळाडूंना सलामीच्या लढतीतच गाशा गुंडाळावा
लागला.
कॅलेंडर ग्रँड स्लॅम विक्रमाच्या प्रतीक्षेत सेरेनाला पहिल्या सामन्यात विजयी घोषित करण्यात आले. सेरेनाने पहिला सेट ६-० असा सहज जिंकला. दुसऱ्या सेटमध्ये २-० अशी स्थिती असताना व्हितालिआ डिआन्तीचेन्कोच्या डाव्या पायाला दुखापत झाल्याने तिने माघार घेतली. सेरेनाचा हा सलग २९वा ग्रँड स्लॅम विजय आहे. पुढच्या लढतीत सेरेनाची लढत किकी बर्टन्सशी होणार आहे. १९८८ मध्ये स्टेफी ग्राफने वर्षांतील चारही ग्रँड स्लॅम जेतेपदांवर नाव कोरले होते. सेरेनाला या विक्रमाची बरोबरी करण्याची संधी आहे. याव्यतिरिक्त सर्वाधिक ग्रँड स्लॅम जेतेपदांचा मार्गारेट कोर्ट यांच्या विक्रमापासून सेरेना केवळ दोन जेतेपदे दूर आहे.
स्लोव्हाकियाच्या डॉमिनिका सिबुलकोव्हाने सातव्या मानांकित अ‍ॅना इव्हानोव्हिकवर ६-३, ३-६, ६-३ असा विजय मिळवला. २३व्या मानांकित आणि माजी विजेत्या व्हीनस विल्यम्सने मोनिका प्युगवर ६-४, ६-७ (७-९), ६-३ अशी मात केली. कॅनडाच्या युझेनी बोऊचार्डने अमेरिकेच्या अ‍ॅलिसन रिस्कला ६-४, ६-३ असे नमवले. पोलंडच्या अ‍ॅग्निझेस्का रडवानस्काने चेक प्रजासत्ताकच्या सिनिकोव्हाचा ६-२, ६-३ असा पराभव केला.
पुरुषांमध्ये जोकोव्हिचने ब्राझीलच्या जाओ सौझाचा ६-१, ६-१, ६-१ असा धुव्वा उडवला. गतविजेत्या मारिन चिलीचने अर्जेटिनाच्या ग्याइडो पेलावर ६-३, ७-६ (७-३), ७-६ (७-३) असा विजय मिळवला. आठवे मानांकन मिळालेल्या राफेल नदालने संघर्षपूर्ण लढतीत क्रोएशियाच्या बोरना कोरिकवर ६-३, २-६, ६-४, ६-४ अशी मात केली. नदालने पहिला सेट जिंकत आश्वासक सुरुवात केली. यंदाच्या वर्षीच फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत नदाला ९ वर्षांनंतर पराभवाला सामोरे जावे लागले. विम्बल्डन स्पर्धेतही प्राथमिक फेरीतूनच त्याला गाशा गुंडाळावा लागला. त्या पाश्र्वभूमीवर ही ग्रँड स्लॅम स्पर्धा नदालच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. पहिल्या लढतीत नेहमीच्या आत्मविश्वासाने खेळ करत नदालने विजयी आगेकूच केली.
गेल्या वर्षी जपानच्या युवा केई निशिकोरीने अंतिम फेरीपर्यंत धडक मारली होती. ग्रँड स्लॅम जेतेपदावर नाव कोरणारा पहिला आशियाई खेळाडू होण्याची निशिकोरीला संधी होती. मात्र गेल्या वर्षी त्याला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. यंदाही निशिकोरीकडून चांगल्या खेळाची अपेक्षा होती. मात्र फ्रान्सच्या बेनॉइट पेअरने निशिकोरीवर ६-४, ३-६, ४-६, ७-६ (८-६), ६-४ असा विजय मिळवला.

Story img Loader