‘एकाच या जन्मी जणू फिरूनी नवी जन्मेन मी..’ या सर्जनशील कवी सुधीर मोघे यांच्या लोभसवाण्या ओळी गेल्या रविवारी दोन दिग्गजांनी सार्थ ठरवल्या. दोघांचेही जीवनप्रवास अगदी भिन्न. पण यंदा परिस्थितीने दोघांना अनपेक्षितपणे कारकीर्दीत समान अशा विवक्षित वळणावर उभं केलं. त्या वळणावरून कारकीर्दीचा शेवट दृष्टिक्षेपात होता. पण कारकीर्द अशी थांबणं दोघांनाही मंजूर नव्हतं. खेळणं जिंकण्यासाठीच असतं. जिंकता आलं नाही की आजूबाजूचे कटाक्ष बोचरे होत जातात. हे दोघे अशा कटाक्षांनाही सरावले होते. सगळं जिंकून झालंय, आता आनंदासाठी खेळतो असंही दोघांनी सांगून बघितलं. पण जेतेपदांना समानार्थी शब्द झालेली त्यांची नावं त्यांना स्वस्थ बसू देईनात. टीकाकारांसाठी नाही, मात्र स्वत:ची परीक्षा म्हणून त्यांनी पण केला. दिवास्वप्न वाटावं असा तो पण त्यांनी गेल्या रविवारी प्रत्यक्षात साकारला. जगाच्या कानाकोपऱ्यात पसरलेल्या चाहत्यांच्या दुवा फलद्रूप झाल्या आणि पस्तिशीत त्या दोघांनी ग्रँडस्लॅम जेतेपद नावावर केलं. ‘वाढतं वय म्हणजे मर्यादा’ या समजाला आपल्या भन्नाट ‘सव्‍‌र्हिस’ने कोर्टबाहेर भिरकावून देणारे ते दोघं म्हणजे सेरेना विल्यम्स आणि रॉजर फेडरर. विक्रम, आकडेवारी, प्रचंड धनराशी हे ओघानं आलंच; परंतु त्याहीपेक्षा ऊर्जावान नव्या पिढीलाही तडाखा देण्याची क्षमता आजही असल्याचं त्यांनी सिद्ध केलं. पुरुषाने रडू नये असा अलिखित संकेत असतानाही फेडररच्या डोळ्यांत तरळलेले अश्रू आणि ताकदवान गुणवैशिष्टय़ांमुळे ‘पुरुषी महिला खेळाडू’ असं हिणवल्या जाणाऱ्या सेरेनाच्या डोळ्यांतले अश्रू दोघांच्या यशातला साम्य योगायोग. ऐतिहासिक जेतेपदानंतर दोघांनीही कारकीर्दीचा शेवट आता दिसू लागलाय असं सूतोवाच केलं. ते थांबणं आशयघन असेल, अपूर्ण नाही.

जेतेपदांच्या आकडेवारीत महान स्टेफी ग्राफला मागे टाकणाऱ्या सेरेनाची मानसिक कणखरता तिच्या प्रदीर्घ वाटचालीचं रहस्य आहे. ‘अमेरिका फर्स्ट’ असा नारा अमेरिकेच्या नूतन अध्यक्षांनी दिला. जगात कुठेही भूमिपुत्रांना नेहमीच प्राधान्य असतं. सेरेना आफ्रो-अमेरिकन वंशाची आहे. समस्त अमेरिकेला अभिमान वाटेल असे क्षण वारंवार देणाऱ्या सेरेनाची या उपरेपणावरून सातत्याने हेटाळणी होते. तिच्या बाबांना रंगभेदाच्या कारणावरून तथाकथित उच्चवर्णीयांनी मैदानातून बाहेर काढलं होतं. अनभिषिक्त सम्राज्ञी असूनही आजही सेरेनाला रंग आणि वंश यावरून शेलक्या टोमण्यांना सामोरं जावं लागतं. विकृत लोकांनी घडवून आणलेल्या शूटआऊटमध्ये सेरेनानं आपल्या एका बहिणीला गमावलं. गेल्या रविवारी सेरेना आणि बहीण व्हीनस या दोघींनीही आपल्या भाषणात त्या बहिणीला अभिवादन केलं. बोलणारे बोलत राहतील, आपण जिंकत राहावं, हा मंत्र सेरेनानं सर्वार्थानं जपला.

Uddhav Thackeray on PM Narendra Modi
“आधी मणिपूर ‘सेफ’ करा आणि मग…”; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं मोदी सरकारवर टीकास्र!
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Testimony of Eknath Shinde regarding Malegaon district
दादा भुसे यांना दुप्पट मताधिक्य द्या, तुम्हाला मालेगाव जिल्हा देतो; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही
Eknath Shinde, Vijay Shivtare, Purandar Haveli,
पुरंदर विमानतळ ‘असा’ उभारणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा ! विजय शिवतारे यांच्या प्रचारार्थ घेतली सभा
Guru Nakshatra Gochar 2024
२८ नोव्हेंबरला गुरु बदलणार आपली चाल! ‘या’ राशीच्या लोकांच्या आयुष्यात येणार आनंद, मिळेल अपार धन
vinoba bhave, vinoba bhave life, vinoba bhave work,
ज्ञानयोगी विनोबांचे स्मरण
Numerology
‘या’ तारखेला जन्मलेले लोक कमी वयात होतात श्रीमंत, कमावतात आयुष्यात भरपूर धन-संपत्ती

गेल्या १५हून अधिक वर्षांत जेतेपदांवरल्या सेरेनाच्या मक्तेदारीमुळे महिला टेनिस नीरस झाल्याची टीका सातत्याने होते. एका अर्थी ही टीका सेरेनाच्या अथक मेहनतीला मिळणारी पावती आहे. सेरेनाच्या खेळाचा अभ्यास करता येईल असं आधुनिक तंत्रज्ञान आणि प्रशिक्षक सहयोगींचा ताफा दिमतीला असूनही अन्य जणी तिला टक्कर देऊ शकल्या नाहीत, हे वास्तव आहे. आकर्षक रंगसंगतीचे पोशाख, वेशभूषा, पादत्राणे, टॅटू यापेक्षाही घोटीव कौशल्यरूपी अलंकार सेरेनाकडे आहेत आणि तिच्या कॅलिडोस्कोपी यशाला तो खुलून दिसतो. तुल्यबळ प्रतिस्पर्धी समोर उभा ठाकला की खेळ आपोआप उंचावतो. सेरेनाला अशी संधी अभावानेच मिळते, मात्र तरीही दणदणीत वर्चस्वासह जिंकण्याचा हट्ट ती सोडत नाही. सेरेनाच्या जिंकण्यापेक्षा पराभवाला जास्त प्रसिद्धी मिळते.

ताकद सेरेनाचे बळ. तिच्या खेळात कलात्मकता नाही, शैली नाही अशी ओरडही होते. मात्र विजेता कोणत्या सूत्रानं जिंकलाय या इतकंच तो सतत जिंकतोच आहे, याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. प्रतिस्पध्र्याला भेदून समोरच्या भिंतीवर धाड असा चेंडूरूपी सव्‍‌र्हिसचा आवाज आणि ‘१५-३०-४० आणि गेम सेरेना’ अशी पंचांची घोषणा कानात घुमत राहते. ३५व्या वर्षी दुखापतींनी ग्रासलेलं शरीर आणि मन यांना नव्यानं प्रेरित करीत

सेरेनानं मिळवलेलं जेतेपद विलक्षण आहे.

चाहत्यांचा स्नेह या मुद्दय़ावर रॉजर फेडरर दंतकथा झाला आहे. त्याचा सराव पाहण्यासाठीही हजारो चाहते गर्दी करतात. आदर्श असावा तर फेडररसारखा अशी उदाहरणं दिली जातात. शालीन वावर, शब्दातलं मार्दव, खेळण्यातली कलात्मकता यामुळे फेडरर हा एक अनुभव आहे. हा अनुभव समरसून मनात कोरण्यासाठी जगभरातल्या चाहत्यांची धडपड उडते. टेनिसविश्वात जे जे आहे, ते ते फेडररचं जिंकून झालंय. सर्वाधिक कमाई करणाऱ्या क्रीडापटूंच्या जागतिक यादीत अव्वल पाचमध्ये त्याचं नाव आहे. पण या संपत्तीचा जराही गर्व फेडररच्या वागणुकीत जाणवत नाही. कोर्टवरच्या कॅनव्हासवर रॅकेटरूपी कुंचल्यासह अनोखं चित्र चितारणारा हा चित्रकार म्हणून लाडका आहे. फेडरर खेळत नाही, तो मैफल सजवतो. चेहऱ्यावरच सात्त्विक ऊर्जा विलसणाऱ्या फेडररसाठी गेल्या पाच वर्षांत अनेक मैफली अर्धवट राहिल्या. रियाझ उत्तम होऊनही शेवट मनासारखा होत नसे. शरीराच्या कुरबुरी तीव्र झाल्या. ‘आता पुरे’ अशा सूचना आणि सल्ले वाढू लागले. खेळभावना जगणाऱ्या फेडररला हा सल त्रास देत होता. फेडररला जेतेपदाविना रित्या हातांनी जाताना पाहणं, हे त्याच्यापेक्षा चाहत्यांना क्लेशदायक होतं. हा क्लेश मिटवण्यासाठी फेडररनं चंग बांधला. गुडघ्यावरच्या शस्त्रक्रियेनंतर खेळाडू निरोपाचा नारळ घेतात. फेडररनं परतायचं ठरवलं.

पृथ्वीवरचा स्वर्ग असणाऱ्या स्वित्र्झलडच्या टुमदार घरात पत्नी मिर्काच्या साथीनं दोन जुळी मुलं आणि दोन जुळ्या मुली यांना बापाची माया देताना तो टेनिस विसरला नाही. प्रत्येक फटका तासून काढला. प्रतिस्पर्धी खेळाडूंचा सखोल अभ्यास केला. शरीर लयबद्ध करण्यासाठी अपार मेहनत घेतली. ऑस्ट्रेलियन स्पर्धेसाठी फेडररला १७वं मानांकन देण्यात आलं. ‘काय ही घसरण’ अशी टीकाही झाली. मात्र जेतेपदासाठीचा हा १७वा संभाव्य खेळाडू प्रतिस्पध्र्यासाठी खतरा ठरला. महानत्वाचं कर्तेपण वृथा मिरवत नाही, हे फेडररनं सप्रमाण सिद्ध केलं. वयाच्या आकडय़ाचा रकाना निव्वळ तांत्रिक ठरवत फेडररनं मिळवलेले जेतेपद म्हणूनच राजहंसी आहे.

पराग फाटक

parag.phatak@expressindia.com