न्यूयॉर्क : सेरेना विल्यम्सने वांग क्विंगला फक्त ४४ मिनिटांत नामोहरम करून अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेतील शतकमहोत्सवी विजयाची नोंद केली आणि विक्रमी २४व्या ग्रँडस्लॅम जेतेपदाकडे दिमाखात वाटचाल केली.
सहा वेळा अमेरिकन विजेत्या सेरेनाने मंगळवारी चीनच्या १८व्या मानांकित वांगला ६-१, ६-० असे सहज पराभूत केले. आता उपांत्य फेरीत तिची युक्रेनच्या एलिना स्विटोलिनाशी गाठ पडणार आहे. अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेच्या इतिहासात विजयांचे शतक नोंदवणाऱ्या ख्रिस एव्हर्टच्या पंक्तीत आता सेरेना दाखल झाली आहे.
३७ वर्षीय सेरेना मार्गारेट कोर्टच्या २४ ग्रँडस्लॅम विजेतेपदांची बरोरी साधण्यासाठी उत्सुक आहे. २७ वर्षीय वांगने उपउपांत्यपूर्व सामन्यात फ्रेंच विजेत्या अॅश्लेघ बार्टीला नमवण्याची किमया साधली होती. परंतु आर्थर अॅश स्टेडियमवर सेरेनापुढे तिचा निभाव लागू शकला नाही.
पाचव्या मानांकित स्विटोलिनाने ब्रिटनच्या जोहाना कोंटाचा ६-४, ६-४ असा पराभव करीत उपांत्य फेरी गाठली. अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेची उपांत्य फेरी गाठणारी स्विटोलिना ही युक्रेनची पहिली महिला खेळाडू ठरली आहे. जुलैमध्ये तिने विम्बल्डनच्या उपांत्य फेरीत स्थान मिळवले होते.
दिमित्रोव्हकडून फेडररला धक्का
ग्रिगर दिमित्रोव्हने २० ग्रँडस्लॅम विजेत्या रॉजर फेडररवर धक्कादायक विजयाची नोंद करीत अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली. त्याला अंतिम फेरी गाठण्यासाठी आता डॅनिल मेदव्हेदेव्हचा अडथळा ओलांडावा लागणार आहे.जागतिक क्रमवारीत ७८व्या स्थानावर असलेल्या बल्गेरियाच्या दिमित्रोव्हने टेनिसमधील सम्रान फेडररविरुद्धचे याआधीचे सातही सामने गमावले होते. परंतु आर्थर अॅश स्टेडियमवर मंगळवारी झज्ञलेल्या नाटय़पूर्ण लढतीत दिमित्रोव्हने फेडररला ३-६, ६-४, ३-६, ६-४, ६-२ असे पराभूत केले. मेदव्हेदेव्हने तीन वेळा ग्रँडस्लॅम विजेत्या स्टॅन वॉवरिंकाचा ७-६ (८/६), ६-३, ३-६, ६-१ असा पराभव केला.
मी अमेरिकन खुल्या स्पर्धेत पहिला विजय मिळवला, तेव्हा मी फक्त १६ वर्षांची होती. या स्पर्धेत १००वा विजय साकारू शकेन, असे अजिबात वाटले नव्हते. त्यामुळे खरेच हे सारे अविश्वसनीय आहे.
-सेरेना विल्यम्स