घरच्या मैदानावर खेळण्याचा फायदा घेतानाच त्याचे दडपण न घेता सेरेना विल्यम्स हिने पाचव्यांदा अमेरिकन खुली टेनिस स्पर्धा जिंकली. तिने चुरशीच्या अंतिम लढतीत बेलारूसची खेळाडू व्हिक्टोरिया अझारेन्का हिच्यावर ७-५, ६-७ (६-८), ६-१ असा विजय मिळविला. तिचे हे सतरावे ग्रँड स्लॅम विजेतेपद आहे.
गतवर्षी सेरेना हिने या स्पर्धेत अजिंक्यपद मिळविताना अझारेन्कावरच मात केली होती. त्याच लढतीची पुनरावृत्ती करीत सेरेना हिने ३१व्या वर्षीही आपण ग्रँड स्लॅम स्पर्धाजिंकू शकतो याचा प्रत्यय घडविला. खुल्या स्पर्धाच्या युगातील सर्वात वयस्कर विजेती होण्याची किमया तिने केली. १९७३मध्ये मार्गारेट कोर्ट हिने ही स्पर्धा जिंकली होती. तिच्यापेक्षा सेरेना ही २९३ दिवसांनी वयोवृद्ध खेळाडू ठरली.
एकाच वर्षी अमेरिकन व फ्रेंच स्पर्धा जिंकणारी ही दुसरी खेळाडू आहे. यापूर्वी २००७ मध्ये जस्टीन हेनिन हिने या दोन्ही स्पर्धा जिंकल्या होत्या. २०१०मध्ये किम क्लायस्टर्स हिने विजेतेपद राखण्याचा पराक्रम केला होता. त्यानंतर विजेतेपद राखणारी सेरेना ही पहिलीच महिला खेळाडू आहे. ऑस्ट्रेलियन स्पर्धा दोन वेळा जिंकणाऱ्या अझारेन्काकडून येथे गतवर्षीच्या पराभवाच्या परतफेडीची अपेक्षा होती. मात्र यंदा या स्पर्धेत सातत्यपूर्ण झंझावाती खेळ करणाऱ्या सेरेना हिने पावणेतीन तासांच्या लढतीनंतर आपले श्रेष्ठत्व सिद्ध केले. या स्पर्धेतील महिलांच्या गटात सर्वात जास्त वेळ अंतिम लढत रंगली. यापूर्वी १९८१ मध्ये ट्रेसी ऑस्टिन हिने दोन तास ४० मिनिटांच्या लढतीनंतर मार्टिना नवरतिलोवास हरवत अजिंक्यपद मिळविले होते. तिने या सामन्यात नऊ बिनतोड सव्र्हिस व ३६ वेळा गुण मिळणाऱ्या फटक्यांचा उपयोग केला. सेरेना हिने मिळालेल्या १२ ब्रेकपॉइंट्सच्या संधीपैकी सात ब्रेकपॉइंट्सचा उपयोग केला. अझारेन्कास आठ वेळा ब्रेकपॉइंट्स मिळाले, मात्र त्यापैकी निम्मेच गुण तिने घेतले. सेरेना हिने पाच वेळा डबल फॉल्ट केला तर अझारेन्काने सात वेळा डबल फॉल्ट केला. सेरेना हिने विजेतेपदाबरोबरच एक लाख डॉलर्सच्या बोनस पारितोषिकासह ३६ लाख डॉलर्सची कमाई केली. तिने येथे १९९९, २००२, २००८ व २०१२ मध्ये विजेतेपद मिळविले आहे.
अंतिम सामन्यातील दुसऱ्या सेटमध्ये विजेतेपद मिळविण्याची सेरेनास संधी होती. मात्र तिने सव्र्हिस गमावली. हा सेट घेत अझारेन्काने सामन्यातील उत्कंठा वाढविली. तिसऱ्या सेटमध्ये सुरुवातीस तिला सव्र्हिसब्रेक करण्याची संधी मिळाली होती, मात्र त्याचा फायदा तिला घेता आला नाही. व्हिक्टोरिया ही अतिशय जिगरबाज खेळाडू आहे, त्यामुळेच तिसऱ्या सेटमध्ये मॅचपॉइंटपर्यंत माझ्यावर दडपण होते.
अमेरिकन खुली टेनिस स्पर्धा : अजूनी यौवनात मी.. सेरेना पाचव्यांदा विजेती
घरच्या मैदानावर खेळण्याचा फायदा घेतानाच त्याचे दडपण न घेता सेरेना विल्यम्स हिने पाचव्यांदा अमेरिकन खुली टेनिस स्पर्धा जिंकली.
First published on: 10-09-2013 at 12:49 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Serena williams defends us open title downs victoria azarenka in final