घरच्या मैदानावर अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेच्या विजेतेपदाची हॅटट्रिक साकारण्याचे स्वप्न सेरेना विल्यम्सने पाहिले आहे. अंतिम सामन्यात तिच्यापुढे डेन्मार्कच्या कॅरोलीन वोझ्नियाकीचे आव्हान समोर आहे.
जागतिक क्रमवारीतील अव्वल स्थानावरील सेरेनाने उपांत्य फेरीत एकतेरिना माकारोवाचा ६-१, ६-३ असा दणदणीत पराभव केला. सेरेना हिने आतापर्यंत पाच वेळा ही स्पर्धा जिंकली आहे. यंदा विजेतेपद मिळविल्यास ती ख्रिस एव्हर्ट व मार्टिना नवरातिलोव्हा यांच्या ग्रँड स्लॅम विजेतेपदाच्या विक्रमांची बरोबरी करेल. या दोन्ही खेळाडूंनी प्रत्येकी १८ ग्रँड स्लॅम विजेतेपदे मिळविली आहेत.
वोझ्नियाकी या दहाव्या मानांकित खेळाडूला शुई पेंग या चीनच्या खेळाडूविरुद्ध झगडावे लागले होते. तिच्याकडे ७-६ (७-१), ४-३ अशी आघाडी असताना पेंग हिला कडक उन्हाचा खूप त्रास झाला. तिला स्ट्रेचरवरूनच मैदानाबाहेर न्यावे लागले. त्यामुळे पंचांनी वोझ्नियाकी हिला विजयी घोषित केले.
वोझ्नियाकी हिने या स्पर्धेत पाच ग्रँड स्लॅम विजेतेपद मिळविणाऱ्या मारिया शारापोव्हा हिला चौथ्या फेरीत पराभवाचा धक्का दिला होता. वोझ्नियाकीने २००९मध्ये येथे अंतिम फेरी गाठली होती. त्या वेळी तिला किम क्लायस्टर्सकडून पराभव पत्करावा लागला होता.
अंतिम फेरीत पुन्हा स्थान मिळविल्यामुळे सेरेना खूप खूश झाली आहे. ती म्हणाली, ‘‘निराशाजनक वर्षांनंतर अमेरिकन स्पध्रेत अंतिम फेरीत पोहोचल्यामुळे मला खूप आनंद झाला आहे. त्यातही लागोपाठ तिसऱ्यांदा मला येथे अजिंक्यपद मिळविण्याची संधी मिळत असल्यामुळे खरोखरीच माझे मनोधैर्य उंचावले आहे. ही स्पर्धा जिंकण्याचेच माझे ध्येय आहे. वोझ्नियाकी हिला मी कमी लेखत नाही. स्पध्रेतील तिच्या अनपेक्षित कामगिरीमुळे मी सावधपणेच खेळणार आहे.’’
– सेरेना विल्यम्स
वोझ्नियाकी हिने या लढतीनंतर सांगितले, ‘‘पेंग अतिशय दुर्दैवी आहे. तिच्याकडे चांगले नैपुण्य आहे, हे मी दोन्ही सेट्समध्ये पाहिले आहे. मला असा विजय नको होता. सामना पूर्ण झाला असता तर मला अधिक आनंद झाला असता. अर्थात केव्हाही खेळापेक्षा आपले आरोग्य अधिक महत्त्वाचे आहे. पेंग हिला यापूर्वी हृदयाच्या शस्त्रक्रियेस सामोरे जावे लागले होते असे मला समजले होते, तरीही ती या स्पध्रेत जिद्दीने खेळली हीच गोष्ट खूप महान आहे. ती लवकरात लवकर पूर्णपणे तंदुरुस्त होईल अशी मला खात्री आहे.’’
कॅरोलीन वोझ्नियाकी