‘सेरेना विल्यम्स’ या नावाचा महिमा किती जबरदस्त याचा प्रत्यय फ्रेंच खुल्या स्पर्धेच्या लाल मातीवर शनिवारी पाहायला मिळाला. वयाची तिशी पार केलेल्या आणि दुखापतींचे चक्रव्यूह भेदून पुन्हा विजयपथावर मार्गक्रमण करणाऱ्या सेरेनाने मारिया शारापोव्हासारख्या अव्वल खेळाडूला अंतिम फेरीत ६-४, ६-४ असा धुव्वा उडवला. तब्बल अकरा वर्षांनी सेरेनाने फ्रेंच खुल्या स्पर्धेच्या जेतेपदावर पुन्हा नाव कोरण्याची किमया साधली. शक्ती आणि युक्ती दोन्हींचा चतुराईने उपयोग करत सेरेनाने हे जेतेपद साकारले. गेल्या वर्षी याच स्पर्धेत खेळताना सलामीच्या सामन्यातच तिला धक्कादायक पराभवाला सामोरे जावे लागले होते.
३१ वर्षीय सेरेनाचे हे कारकीर्दीतील १६वे ग्रँडस्लॅम जेतेपद ठरले. गेल्या वर्षी विम्बल्डन, ऑलिम्पिक सुवर्णपदक, अमेरिकन स्पर्धा आणि यंदा फ्रेंच अशा पाच जेतेपदांवर नाव कोरत सेरेनाने महिला टेनिसविश्वातील आपली हुकूमत सिद्ध केली. दुसरीकडे अन्य खेळाडूंविरुद्ध दर्जेदार खेळ करणारी शारापोव्हा सेरेनाचा झंझावात दहाव्या लढतीतही रोखू शकली नाही. सेरेनाच्या वर्चस्वामुळे शारापोव्हाला आपले जेतेपद कायम राखता आले नाही.
पहिल्या सेटमध्ये शारापोव्हाने ३-० अशी आघाडी घेतली होती. परंतु वेगवान सव्‍‌र्हिस आणि जमिनीलगतच्या ताकदवान फटक्यांच्या जोरावर तिने पिछाडी भरून काढली. शारापोव्हाने सेरेनाला टक्कर देत ४-४ अशी बरोबरी केली. पण यानंतर सेरेनाने तुफानी आक्रमण करत शारापोव्हाला निष्प्रभ केले आणि पहिला सेट नावावर केला.
दुसऱ्या सेटमध्ये पाच ब्रेकपॉइंट्स वाचवत शारापोव्हाने सामन्यातले आव्हान जिवंत राखण्यासाठी आटोकाट प्रयत्न केला. मात्र तिच्या कमकुवत सव्‍‌र्हिसचा फायदा उठवत सेरेनाने ४-२ अशी आगेकूच केली. सलग तीन बिनतोड सव्‍‌र्हिस करत सेरेनाने जेतेपदावर शिक्कामोर्तब केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘‘आजचा दिवस खूप कठीण होता. ११ वर्षांनंतर फ्रेंच खुल्या स्पर्धेचे जेतेपद पटकावले. आता माझ्या नावावर १६ ग्रँडस्लॅम जेतेपदे आहेत. परंतु पुढील वर्षी पुन्हा पॅरिसला यायला आवडेल. पॅरिस आणि इथली माणसे यांची मी चाहती आहे. मला पुन्हा याच भूमीवर जिंकायला आवडेल. पॅरिसमध्ये मी वेळ व्यतीत करताना मी जणू पॅरिसची नागरिकच आहे, असे मला वाटायला लागले आहे!’’
-सेरेना विल्यम्स