बाळंतपणानंतर टेनिस कोर्टवर यशस्वीपणे पुनरागमन करणाऱ्या सेरेना विल्यम्सने टेनिस कोर्टवर आपलं नाणं खणखणीत वाजवून दाखवलं आहे. मात्र काही दिवसांपूर्वी झालेल्या सिलीकॉन व्हॅली क्लासिक टेनिस स्पर्धेत सेरेनाला जोहाना कोंटा या प्रतिस्पर्धी खेळाडूकडून ६-१, ६-० असा पराभव स्विकारावा लागला. अवघ्या ५३ मिनीटांमध्ये कोंटाने सेरेनाचा धुव्वा उडवल्यामुळे, या पराभवाबद्दल सर्वत्र उलटसुलट चर्चा सुरु झाल्या होत्या. मात्र Time Magazine ला दिलेल्या मुलाखतीत सेरेनाने आपल्या पराभवामागचं खरं कारण सांगितलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सामना सुरु होण्यापूर्वी काही मिनीटं आधी सेरेनाला आपली सावत्र बहिण येतुंदे प्राईसचा मारेकरी पॅरोलवर सुटल्याची माहिती समजली. ही बातमी समजल्यानंतर मी सामन्यावर आपलं लक्ष केंद्रीत करु शकले नाही असं सेरेनाने मान्य केलं आहे. २००३ साली रॉबर्ट मॅक्सफिल्ड नावाच्या इसमाने सेरेनाची बहिण येतुंदेवर गोळीबार केला होता. या घटनेनंतर २००६ साली लॉस एंजलिस कोर्टाने मॅक्सफिल्डला १५ वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली होती. मात्र कारागृहातील चांगल्या वागणुकीच्या बळावर मॅक्सफिल्डची पॅरोलवर सुटका झाल्याचं कळतंय.

“सामन्यादरम्यान ही गोष्ट माझ्या डोक्यातून जात नव्हती. प्रत्येक वेळेला मला तिच्या मुलांचा चेहरा समोर येत होता. लहान वयात त्यांनी आपल्या आईचा दुर्दैवी मृत्यू बघितला आहे. ज्या चांगल्या वागणुकीच्या बळावर मॅक्सफिल्डला पॅरोलवर सोडण्यात आलेलं आहे, त्याने माझी बहिण परत येणार नाही.” सेरेनाने Time Magazine ला दिलेल्या मुलाखतीत त्या पराभवाबद्दल स्पष्टीकरण दिलं.