गतविजेत्यांना बाजूला सारत कामगिरीत सातत्य राखणाऱ्या नोव्हाक जोकोव्हिच आणि सेरेना विल्यम्स यांना ऑस्ट्रेलियन खुल्या स्पर्धेसाठी अव्वल मानांकन देण्यात आले आहे. महिलांमध्ये व्हिक्टोरिया अझारेन्काला मात्र अव्वल ३२ मानांकित खेळाडूंमध्ये स्थान मिळालेले नाही.
या स्पर्धेचे पाचवे जेतेपद मिळवण्यासाठी जोकोव्हिच उत्सुक आहे. गेल्या वर्षी जेतेपद पटकावणाऱ्या स्टॅनिसलॉस वॉवरिन्काने जोकोव्हिचचे आव्हान उपांत्यपूर्व फेरीत संपुष्टात आले होते. ग्रँड स्लॅम जेतेपदांवर वर्चस्व असणाऱ्या त्रिकुटांपैकी राफेल नदाल, रॉजर फेडरर यांच्यासह वॉवरिन्का, अँडी मरे, केई निशिकोरी यांचा अडथळा पार करण्याचे आव्हान जोकोव्हिचसमोर असणार आहे.
दोन वर्षांचा ग्रँड स्लॅम जेतेपदांचा दुष्काळ संपवण्याचे रॉजर फेडररचे उद्दिष्ट आहे. काही दिवसांपूर्वीच ब्रिस्बेन स्पर्धेच्या जेतेपदासह कारकीर्दीतील हजारावा विजय साकारणारा फेडररही जेतेपदाचा प्रबळ दावेदार आहे. ग्रँड स्लॅमचे १८वे विक्रमी जेतेपद पटकावण्यासाठी फेडरर तयार आहे.
‘लाल मातीचा राजा’ अशी बिरुदावली पटकावणारा राफेल नदाल दुखापतींनी त्रस्त आहे. लाल मातीवर अखंड वर्चस्व गाजवणाऱ्या नदालला ऑस्ट्रेलियन खुल्या स्पर्धेचे केवळ एक जेतेपद मिळवता आले आहे. काही दिवसांपूर्वीच झालेल्या कतार स्पर्धेत सलामीच्या लढतीतच नदालला अनपेक्षित पराभवाला सामोरे जावे लागले होते. विजयपथावर परतण्यासाठी नदालला दुखापतींवर मात करत आगेकूच करावी लागणार आहे. सहा वर्षांनंतर पुन्हा जेतेपदाचा चषक उंचावण्याची नदालला संधी आहे.
वॉवरिन्काने गेल्या वर्षी प्रत्येक फेरीत सातत्यपूर्ण खेळ करत जेतेपदाला गवसणी घातली होती. यंदा या कामगिरीची पुनरावृत्ती करण्यासाठी तो आतुर आहे. चेन्नई स्पर्धेच्या जेतेपदावर नाव कोरत वॉवरिन्काने नव्या हंगामासाठी सज्ज असल्याचे सिद्ध केले आहे. मात्र वॉवरिन्कासाठी यंदा आव्हान नक्कीच खडतर असणार आहे.
महिलांमध्ये सेरेना विल्यम्स या स्पर्धेच्या सहाव्या जेतेपदासाठी शर्यतीत आहे. दुखापती आणि ढासळत्या फॉर्ममुळे सेरेनाला गेल्या वर्षी केवळ एका ग्रँड स्लॅम जेतेपदावर समाधान मानावे लागले होते. नव्या हंगामात विजयपथावर येण्याची सेरेनाला सर्वोत्तम संधी आहे.
ब्रिस्बेन स्पर्धेच्या जेतेपदावर नाव कोरत मारिया शारापोव्हाने दुखापतीतून सावरल्याचे सिद्ध केले आहे. गेल्या वर्षी कारकीर्दीतील ग्रँड स्लॅम जेतेपदांचे वर्तुळ पूर्ण करणाऱ्या शारापोव्हाला नव्या हंगामाची सुरुवात जेतेपदाने करायला निश्चितच आवडेल. पेट्रा क्विटोव्हा, अॅना इव्हानोव्हिक, अॅग्निेझेस्का रडवानस्का, सिमोन हालेप, जेनी बोऊचार्ड यांची नावे जेतेपदासाठी चर्चेत आहेत.
सानिया, पेसवर भारताची भिस्त
दुहेरी प्रकारासाठीचे वेळापत्रक (ड्रॉ) अद्याप जाहीर झालेले नाही. सानिया मिर्झा, रोहन बोपण्णा, लिएण्डर पेस यांच्यावरच भारताची भिस्त असणार आहे.
सेरेना, जोकोव्हिच अव्वल मानांकित
नोव्हाक जोकोव्हिच आणि सेरेना विल्यम्स यांना ऑस्ट्रेलियन खुल्या स्पर्धेसाठी अव्वल मानांकन देण्यात आले आहे.
First published on: 15-01-2015 at 03:46 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Serena williams novak djokovic top seeds for australian open