वर्षांनुवर्षे टेनिस जगतावर आणि जेतेपदांवर अधिराज्य गाजवणाऱ्या सेरेना विल्यम्स आणि व्हीनस विल्यम्स या भगिनींना फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत धक्कादायक पराभवाला सामोरे जावे लागले. अन्य लढतीत रॉजर फेडरर आणि नोव्हाक जोकोव्हिच यांनी आपापल्या लढती जिंकत तिसऱ्या फेरीत आगेकूच केली.
विविध दुखापती आणि ढासळता फॉर्म यामुळे व्हीनस जेतेपदाच्या शर्यत रिंगणात नव्हती. मात्र वर्षभरापूर्वी दुखापतीतून पुनरागमन केल्यानंतर झंझावाती प्रदर्शन करणारी सेरेना जेतेपदाची प्रबळ दावेदार होती. विल्यम्स भगिनींना गाशा गुंडाळावा लागल्यामुळे महिलांमध्ये जेतेपदासाठीची स्पर्धा खुली झाली आहे. स्पेनच्या आणि जागतिक क्रमवारीत ३५व्या स्थानी असलेल्या गारबिन म्युगुरुझाने गतविजेत्या सेरेनावर ६-२, ६-२ अशी सरळ सेट्समध्ये मात करत कारकिर्दीतील खळबळजनक विजयाची नोंद केली.
अन्य लढतीत अना श्मीइलडोव्हाने व्हीनस विल्यम्सवर २-६, ६-३, ६-४ असा विजय मिळवला. २९व्या मानांकित व्हीनसला फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेच्या १६ वारींमध्ये एकदाही जेतेपदावर कब्जा करता आलेला नाही. या पराभवामुळे नजीकच्या काळात व्हीनसची या स्पर्धेचा जेतेपदाचा मुकूट नावावर करण्याची शक्यता मावळली आहे. १९ वर्षीय आणि जागतिक क्रमवारीत ५६व्या स्थानी असलेल्या श्मीइलडोव्हाने दोन मॅचपॉइंट्स गमावले. व्हीनसने परतीचा फटका स्वैर लगावला आणि श्मीइलडोव्हाने बॅकहँड क्रॉसकोर्टच्या सुरेख फटक्याच्या जोरावर सामन्यावर कब्जा केला. दोन्ही भगिनींचा पराभव झाल्यामुळे तिसऱ्या फेरीत सेरेना-व्हीनस मुकाबल्याची शक्यता संपुष्टात आली आहे.
स्पर्धेच्या जेतेपदाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या नोव्हाक जोकोव्हिचने जेरेमी चार्डीवर ६-१, ६-४, ६-२ असा सहज विजय मिळवत तिसऱ्या फेरीत आगेकूच केली. रॉजर फेडररने अर्जेटिनाच्या दिएगो सेबॅस्टिअन श्वाझर्ट्समनवर ६-३, ६-४, ६-४ अशी मात केली.

Story img Loader