संघर्ष तिच्या पाचवीलाच पूजलेला, कधीच टळलेला नाही, खासगी आयुष्य असो किंवा व्यावसायिक, संघर्ष करूनच ती इथपर्यंत आली आणि संघर्षांलाच प्रेरणा मानून तिने सलग चौथ्यांदा अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेवर अधिराज्य गाजवलं. अंतिम फेरीत पहिला सेट जिंकल्यावर ती काही मिनिटांतच विजेतेपद पटकावेल, असे साऱ्यांनाच वाटत होते. कारण बिनतोड सव्र्हिस आणि जोरदार परतीचे फटके तिच्या भात्यात होते.पण समोर अव्वल मानांकित खेळाडूने दुसऱ्या सेटमध्ये बाजी मारली. सेट गमावल्यावर तिने उपविजेतेपदाच्या भाषणाची तयारी मनोमन सुरू केली, पण त्यानंतर आयुष्यातला संघर्ष तिला पुन्हा एकदा आठवला आणि ती नव्याने पेटून उठली. १-१ अशा बरोबरीनंतर तिने पुन्हा नव्याने संघर्षांला सुरुवात केली आणि वयाच्या तिशीतही युवा खेळाडूंना लाजवेल असा दिमाखदार खेळ करत सेरेना विल्यम्सने चौथ्यांदा स्पर्धेच्या विजेतेपदाला गवसणी घातली. अव्वल मानांकित विक्टोरिया अझारेन्काने कडवी झुंज दिली, पण अखेर ती व्यर्थच ठरली. सेरेनाने अटीतटीच्या लढतीत अझारेन्कावर ६-२, २-६, ७-५ असा पराभव केला. या विजेतेपदामुळे एकाच वर्षी विम्बल्डन, ऑलिम्पिक सुवर्णपदक आणि अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेचे जेतेपद पटकावणारी व्हीनस आणि स्टेफी ग्राफनंतरची तिसरी महिला टेनिसपटू ठरली आहे. सेरेनाचे कारकिर्दीतले हे पंधरावे ग्रॅण्ड स्लॅम ठरले आहे.
आपल्याच घरच्या प्रेक्षकांसमोर एखाद्या राजकन्येसारखी ती मैदानात अवतरली. पण खांद्यावरची बॅग ठेवून जेव्हा कोर्टवर उतरली तेव्हा एखाद्या मर्दानीसारखी खेळली आणि जिंकलीही. पहिल्या सेटमध्ये संपूर्ण ताकद लगावत तिने अझारेन्काला हतबल करून सोडले होते. आपल्या सव्र्हिस तिने अझारेन्काला मोडू दिल्या नाहीत, तर अझारेन्काची सव्र्हिस जोरदार परतीच्या फटक्यांच्या जोरावर मोडीत काढली. पहिला सेट ६-२ असा जिंकल्यावर सेरेना सहज विजेतेपदावर कब्जा करेल, असे वाटले होते. पण अव्वल क्रमांकावर असलेली अझारेन्का काही हार मानण्यातली नव्हती. दुसऱ्या सेटमध्ये तिने सेरेनाची मक्तेदारी मोडीत काढली. दुसऱ्या सेटमध्ये लौकिकाला साजेसा खेळ करत तिने सेरेनाला ६-२ असे पराभूत केले आणि सामन्यात १-१ अशी बरोबरी साधली.
दोघींची बरोबरी झाल्याने तिसरा सेट रंगतदार होणार, असे वाटत होते आणि तसेच झाले. तिसऱ्या सेटमध्ये सेरेना आणि अझारेन्का यांनी तोडीस तोड खेळ केला, जिंकण्याची ईर्षां त्या दोघींमध्येही होती, पण शेवटी अनुभवाची धनी असलेल्या सेरेनाने टाय ब्रेकरमध्ये ७-५ असा विजय मिळवला आणि तिला काय करावे, काय नाही, हे सुचतच नव्हते. तिच्या आनंदाला पारावार उरला नव्हता. संपूर्ण कोर्टभर उडय़ा मारत तिने आनंद साजरा केला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा