सेरेना विल्यम्सची किकी बर्टनवर मात
ग्रँड स्लॅम सम्राज्ञी म्हणून ख्याती मिळविलेल्या सेरेना विल्यम्सने किकी बर्टन्सवर संघर्षपूर्ण विजय मिळविला आणि फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत अंतिम फेरी गाठली. तिच्यापुढे विजेतेपद राखण्यासाठी स्पेनच्या गार्बिन म्युग्युरुझाचे आव्हान असणार आहे. चौथ्या मानांकित गार्बिनने समंथा स्टोसूरला पराभूत केले.
सेरेना या गतविजेत्या खेळाडूला बर्टन्स या नेदरलँड्सच्या खेळाडूने प्रत्येक गुणाकरिता झुंजविले. सेरेना हिने हा सामना ७-६ (९-७), ६-४ असा जिंकला. बर्टन्स हिने उपांत्य फेरीत स्थान मिळविताना तीन मानांकित खेळाडूंना पराभवाचा धक्का दिला होता. पहिल्या सेटमध्ये तिने टायब्रेकपर्यंत सेरेना हिला झुंज दिली. अखेर ताकदवान फटक्यांचा उपयोग करीत सेरेना हिने हा सेट घेतला. दुसऱ्या सेटमध्येही तिला सव्‍‌र्हिसब्रेक मिळविण्यासाठी कडवी लढत स्वीकारावी लागली. सेरेना हिने फोरहँडच्या फटक्यांचा उपयोग करीत हा सेट मिळविला आणि सामनाही जिंकला.
गार्बिन हिला समंथा या अनुभवी खेळाडूविरुद्ध विजय मिळविताना फारशी अडचण आली नाही. तिने समंथा हिला ६-२, ६-४ असे सहज हरविले. पहिल्या सेटमध्ये तिने क्रॉसकोर्ट फटक्यांचा सुरेख खेळ केला. तसेच तिने नेटजवळून प्लेसिंगचाही कल्पकतेने उपयोग केला. दुसऱ्या सेटमध्ये २१ वी मानांकित समंथा हिने चांगली झुंज दिली. मात्र गार्बिन हिने तिच्या दुहेरी चुकांचा पुरेपूर फायदा घेतला. तिने या सेटमध्येही सव्‍‌र्हिसब्रेक मिळविला.
सेरेना हिने यापूर्वी येथे २००२, २०१३ व २०१५ मध्ये विजेतेपद मिळविले आहे. तिने एकेरीत आतापर्यंत ऑस्ट्रेलियन, विम्बल्डन व अमेरिकन ओपन या स्पर्धामध्ये प्रत्येकी सहा वेळा अजिंक्यपद पटकाविले आहे. गार्बिन हिने येथे प्रथमच अंतिम फेरी गाठली आहे. यापूर्वी तिने गतवर्षी विम्बल्डन स्पर्धेत उपविजेतेपद मिळविले होते.
महिलांच्या दुहेरीत एकतेरिना माकारोवा व एलिना व्हेसनिना या रशियन जोडीने अंतिम फेरी गाठली. उपांत्य फेरीतील सरळ लढतीत त्यांनी बार्बरा क्रॅजिसोवा व कॅटरिना सिनियाकोवा यांना ६-४, ६-२ असे पराभूत केले.
पुरुषांच्या दुहेरीत मार्क लोपेझ व फेलेसियानो लोपेझ या स्पॅनिश खेळाडूंनी विजेतेपदाच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकले. या जोडीने उपांत्य सामन्यात इव्हान डोडिग व मार्सेलो मिलो यांच्यावर ६-३, ३-६, ७-५ असा निसटता विजय नोंदविला.