खेळाप्रती असलेली निस्सीम व्यावसायिकता जपत सेरेना विल्यम्सने विम्बल्डन जेतेपदाला गवसणी घालताना २१व्या शतकातील ऐतिहासिक पराक्रम साकारला. संपूर्ण स्पर्धेतील शानदार फॉर्म कायम राखणाऱ्या गार्बिन म्युग्युरुझावर सेरेनाने ६-४, ६-४ असा विजय मिळवला.

सेरेनाचे हे कारकीर्दीतील २१वे तर विम्बल्डनचे सहावे ग्रँड स्लॅम जेतेपद आहे. या जेतेपदासह सेरेनाने एकाचवेळी चारही ग्रँडस्लॅम आपल्याकडेच राखण्याचा विक्रम नावावर केला. ३३ वर्षीय सेरेनाने सगळ्यात वयेशीर ग्रँड स्लॅम विजेती होण्याचा मानही पटकावला. संपूर्ण स्पर्धेत शानदार खेळ करणाऱ्या गार्बिनने सेरेनाला टक्कर देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. मात्र सेरेनाने लौकिकाला साजेसा खेळ करत बिनतोड सव्र्हिस या हुकमी एक्काद्वारे सरळ सेट्समध्ये विजय साकारला.
म्युग्युरुझाने ४-२ अशी दमदार आघाडी घेतली. मात्र सेरेनाने ४-४ अशी बरोबरी केली. तडाखेबंद खेळासह पुढचे दोन गुण कमावत सेरेनाने पहिला सेट नावावर केला. दुसऱ्या सेटमध्ये सेरेनाने ५-१ अशी आघाडी घेतली. मात्र म्युग्युरुझाने सहज हार न मानता ३-५ अशी आगेकूच केली. फोरहँडच्या ताकदवान फटक्यासह सेरेनाने विजयावर शिक्कामोर्तब केले.
फ्रेंच खुली स्पर्धा आणि विम्बल्डन या लागोपाठच्या स्पर्धा जिंकण्याचा पराक्रम दोनदा नावावर करणारी सेरेना पहिली टेनिसपटू ठरली आहे. याआधी २००२मध्ये सेरेनाने ही किमया केली होती. वर्षांतले शेवटचे अर्थात अमेरिकन खुल्या स्पर्धेचे जेतेपद पटकावत ‘कॅलेंडर ग्रँड स्लॅम’ पूर्ण करण्याची संधी सेरेनाला आहे. सर्वाधिक ग्रँड स्लॅम जेतेपदे विजेत्यांच्या यादीत स्टेफी ग्राफच्या (२२) विक्रमापासून सेरेना एक जेतेपद दूर आहे. या यादीत मार्गारेट कोर्ट (२४) अव्वल स्थानी आहे. हा विक्रमही सेरेनाला खुणावतो आहे.
यंदाच्या वर्षांत खेळलेल्या ४० सामन्यात सेरेनाची कामगिरी ३९-१ अशी आहे. विम्बल्डन जेतेपदासह २८ सलग ग्रँड स्लॅम विजय मिळवण्याचा विक्रम सेरेनाने नावावर केला आहे.

Story img Loader