अमेरिकेच्या सेरेना विल्यम्सने जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या रशियाच्या मारिया शारापोव्हाचा ६-१, ६-४ असा सहज पराभव करीत माद्रिद मास्टर्स खुल्या टेनिस स्पर्धेच्या जेतेपदाला गवसणी घातली. तिचे हे कारकिर्दीतील ५०वे एकेरी जेतेपद ठरले. ‘‘माझ्या एकेरीच्या प्रत्येक सामन्यात दिलेल्या पाठिंब्यासाठी मी चाहत्यांची ऋणी आहे. हे जेतेपद माझ्यासाठी संस्मरणीय आहे. ५०व्या जेतेपदाने मी आनंदी झाले आहे,’’ असे सेरेनाने सांगितले. स्पेनच्या राफेल नदालने अंतिम फेरीत स्टॅनिस्लॉस वाविरकाचा ६-२, ६-४ असा पाडाव करत माद्रिद मास्टर्स स्पर्धेच्या तिसऱ्या जेतेपदावर मोहोर उमटवली. दुखापतीनंतर पुनरागमन करणाऱ्या नदालचे हे सात स्पर्धामधील पाचवे जेतेपद ठरले. नदालने पटकावलेल्या ५५ जेतेपदांपैकी ४० जेतेपदे ही क्ले-कोर्टवरील आहेत.