गतविजेत्या ऑस्ट्रेलियन संघातील प्रसिद्ध तीन क्रिकेटपटूंनी दुखापतींच्या कारणास्तव भारत दौऱ्यातून माघार घेतली आहे. संपूर्ण क्रिकेटविश्वाचे लक्ष लागलेल्या आगामी टी२० विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर ऑस्ट्रेलियन संघाला दुखापतींमुळे मोठा धक्का बसला आहे. ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये ऑस्ट्रेलियात ही आयसीसी स्पर्धा खेळली जाणार आहे. तत्पूर्वी भारतीय संघ मायदेशात ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध ३ सामन्यांची टी२० मालिका खेळणार आहे. टी२० विश्वचषकाच्या दृष्टीने दोन्हीही संघांसाठी ही मालिका अतिशय महत्त्वपूर्ण असणार आहे.
डेव्हिड वॉर्नरला भारतात होणाऱ्या मालिकेसाठी विश्रांती दिली आहे आणि त्यात आणखी भर म्हणजे मिचेल स्टार्क, मिचेल मार्श व मार्कस स्टॉयनिस असे हे प्रमुख तीन खेळाडू दुखापनग्रस्त झाले आहेत. त्यांच्याजागी आता नॅथन एलिस, डॅनिएल सॅम्स व सीन एबॉट यांचा संघात समावेश करण्यात आला आहे. स्टार्कला गुडघ्याची दुखापत, मार्शला पोटरीची दुखापत अन् स्टॉयनिसला पाठीच्या दुखापतीने त्रस्त केले आहे. झिम्बाब्वेविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत मार्श व स्टॉयनिस यांच्या दुखापतीनं डोकं वर काढलं होतं.
हेही वाचा : मधल्या षटकांमध्ये संथ फलंदाजी चिंतेची बाब, विश्वचषकासाठी सॅमसनच्या नावाची चर्चा नाही
तिघांच्याही दुखापती जास्त गंभीर नाहीत, तरीही क्रिकेट ऑस्ट्रेलियाने टी२० विश्वचषकापूर्वी कसलीही जोखीम न घेण्याच्या हेतूने त्यांना भारताविरुद्ध न खेळवण्याचा निर्णय घेतला आहे. ऑस्ट्रेलियन संघासाठी यामध्ये सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे एकदाच तीन खेळाडूंना दुखापती होणे. यामुळे भारताविरुद्ध होणाऱ्या मायदेशातील मालिकेत ऑस्ट्रेलिया सारखा बलाढ्य संघ कागदवर दुबळा वाटतो आहे. १५ सप्टेंबरला ऑस्ट्रेलियाचा संघ भारतात येण्यासाठी उड्डाण भरू शकतो.
ऑस्ट्रेलियाचा संघ
सिन ऍबॉट, ऍश्टन ऍगर, पॅट कमिन्स, टिम डेविड, नॅथन एलिस, ऍरॉन फिंच (कर्णधार), कॅमेरॉन ग्रीन, जोश हेझलवूड, जोश इंग्लिस, ग्लेन मॅक्सवेल, केन रिचर्डसन, डॅनियल सॅम्स, स्टिव्ह स्मिथ, मॅथ्यू वेड, ऍडम झम्पा.
भारतीय संघ
रोहित शर्मा (कर्णधार), लोकेश राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, रिषभ पंत, दिनेश कार्तिक, हार्दिक पांड्या, आर अश्विन, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, हर्षल पटेल, दीपक चहर, जसप्रीत बुमराह</p>