चीनमध्ये धुमाकूळ घातलेल्या करोना विषाणूने भारतामध्येही शिरकाव केल्यानंतर केंद्र सरकार आणि संबंधित यंत्रणा जाग्या झाल्या आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांनी कोणत्या गोष्टी करु नयेत यासाठी जनजागृती करण्यात येते आहे. यामध्येच गर्दीची ठिकाणं टाळण्याच्या सुचनाही देण्यात आल्या आहेत. त्यातच २९ मार्चपासून सुरु होत असलेल्या आयपीएलवरही संभ्रमाचं वातावरण आहे. अशातच, आयपीएलला परवानी देऊ नका यासाठी मद्रास उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आलेली आहे. त्यावर २३ मार्चपर्यंत उत्तर देण्याचे आदेश मद्रास उच्च न्यायालयाने BCCI ला दिले आहेत.

स्थानिक वकिल जी. अ‍ॅलेक्स बेंझिगीर यांनी ही याचिका दाखल केली असून १२ मार्च रोजी जस्टीस एम. एम. सुंदरेश आणि कृष्णा रामास्वामी यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी होणार होती. जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार करोना विषाणूवर अद्याप कोणतही ठोस औषध मिळालेलं नाहीये. त्यातच आयपीएलसारख्या स्पर्धांमध्ये या विषाणूचा प्रादूर्भाव झाला तर चिंतेचं कारण निर्माण होण्याची शक्यता आहे, यासाठी केंद्र सरकारने आयपीएलला परवानगी देऊ नये, यासाठी ही याचिका दाखल झालेली आहे. यावर आता BCCI कडून उत्तर मागण्यात आले आहे.

IPL व्यतिरीक्त जगभरातील अनेक क्रीडा स्पर्धांवर करोनाचं सावट आहे. जुलै महिन्यात टोकियो ऑलिम्पिक स्पर्धाही संकटात सापडलेली आहे. महाराष्ट्रातही आयपीएलचे सामने होऊ द्यायचे की नाही यावर विचारमंथन सुरु आहे. त्यात बीसीसीआयने मात्र आयपीएल स्पर्धा होणारच अशी भूमिका घेतलेली आहे. त्यामुळे आगामी काळात आयपीएलसंदर्भात काय भूमिका घेतली जातेय याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.

Story img Loader