सेव्हिला संघाने रविवारी व्हिलारिअल संघावर २-१ असा निसटता विजय मिळवून ला लीगा फुटबॉल स्पर्धेत बार्सिलोनासह अव्वल स्थान पटकावले आहे. गतविजेत्या अ‍ॅटलेटिको माद्रिदने गेटाफेवर १-० अशी मात करत पाचव्या स्थानी झेप घेतली आहे. व्हिलारिअलच्या लुसिआनो विएट्टोने कानीच्या पासवर गोल करत ११व्या मिनिटालाच खाते खोलले होते. त्यामुळे व्हिलारिअल तीन गुणांची कमाई करणार, असे चित्र दिसत होते. पण सामना संपायला दोन मिनिटे शिल्लक असताना डेनिस सुआरेझने गोल करत सेव्हिलाला बरोबरी साधून दिली. त्यानंतर अतिरिक्त वेळेत व्हिलारिअलच्या जिओवानी दोस सांतोसने बेनॉईट ट्रेमौलिनासला गोलक्षेत्रात धक्काबुक्की केल्याप्रकरणी सेव्हिलाला पेनल्टी-किक मिळाली. याचा फायदा उठवत कालरेस बाक्काने गोल करून सेव्हिलाला विजयासह तीन गुणांची कमाई करून दिली.
आता बार्सिलोना आणि सेव्हिलाचे २२ गुण झाले असून गोलफरकाच्या आधारावर बार्सिलोना संघ अव्वल स्थानी आहे. रिअल माद्रिदने २१ गुणांसह तिसरे स्थान प्राप्त केले आहे.

Story img Loader