‘ला लिगा’ स्पध्रेच्या जेतेपदाच्या शर्यतीत अव्वल स्थानावर असलेल्या बार्सिलोना संघाचा विजयी रथ रविवारी सेव्हिल्ला संघाने अडवला. सेव्हिल्लाने ०-२ अशा पिछाडीवरून बार्सिलोनाची बचावफळी भेदून ही लढत २-२ अशा बरोबरीत सोडवण्याचा पराक्रम केला.
तत्पूर्वी झालेल्या लढतीत माद्रिदने ३-० अशा फरकाने ऐबार संघाचा पराभव केला होता. गुणफरक कमी झाल्याने माद्रिदच्या जेतेपदाच्या आशा पल्लवीत झाल्या असून त्यांच्या सात लढती शिल्लक आहेत. माद्रिदच्या या विजयात ख्रिस्टीआनो रोनाल्डो, झेव्हियर हर्नाडेज आणि जेसे रॉड्रीग्ज यांनी प्रत्येकी एक गोल केला. अ‍ॅटलेटिको माद्रिद आणि मलागा यांच्यातील लढत २-२ अशा बरोबरीत सुटली.
लिओनेल मेस्सी (१४ मि.) आणि नेयमार (३१ मि.) यांच्या प्रत्येकी एक गोलच्या बळावर बार्सिलोनाने २-० अशी आघाडी घेत स्पध्रेतील सलग दहावा विजय जवळपास निश्चित केला होता, परंतु सेव्हिल्लाच्या एवर बॅनेगा (३८ मि.) आणि केव्हिन गॅमेइरो (८४ मि.) यांनी गोल करून बार्सिलोनाच्या विजयाच्या स्वप्नावर पाणी फेरले. या पराभवामुळे बार्सिलोना आणि रिअल माद्रिद यांच्यातील गुणफरक दोन गुणांनी कमी झाला आहे. बार्सिलोनाच्या खात्यात ७५, तर माद्रिदच्या खात्यात ७३ गुण जमा आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा