महिला कुस्तीपटूंवर लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपावरून ब्रिजभूषण सिंह यांच्यावर एफआयआर दाखल करण्यात आला आहे. कुस्तीपटूंनी पुकारलेले आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले असले तरीही या प्रकरणी आरोपीविरोधात लवकरात लवकर कारवाई व्हावी अशी मागणी कुस्तीपटूंनी केली आहे. दरम्यान, याप्रकरणातील पुढील पाऊल म्हणून तक्ररादारांची चौकशी करण्यात येत असून सीआरपीसीच्या कलम ९१ अंतर्गत दोन महिला कुस्तीपटूंना ५ जून रोजी नोटीस बजावण्यात आली होती. या नोटीसीला उत्तर देण्याकरता एक दिवसाचा कालावधी देण्यात आला होता.
पोलिसांनी कुस्तीपटूंचीही चौकशी केली. या चौकशीदरम्यान त्यांना ऑडियो, व्हिडीओ, आणि फोटो पुरावे म्हणून देण्यास सांगण्यात आले आहे, इंडियन एक्स्प्रेसने यासंदर्भातील वृत्त दिले आहे. तसंच, एका महिला कुस्तीपटूला मारलेल्या मिठीचाही फोटो पोलिसांनी मागितला आहे.
एफआयआरनुसार, लैंगिक छळाच्या या घटना २०१६ ते २०१९ या काळात २१, अशोका रोड येथील WFI कार्यालयात आणि ब्रिजभूषण सिंग यांच्या बंगल्यावर घडल्या आहेत. तसंच, काही घटना परदेशात स्पर्धांदरम्यान घडल्या आहेत. एका महिला कुस्तीपटूने परदेशात मोठे पदक जिंकल्यानंतर ब्रिजभूषण सिंह यांनी तिला १० ते १५ सेकंद मिठी मारली होती. यावेळी ब्रिजभूषण अधिक जवळ येऊ नयेत म्हणून संबंधित खेळाडूने तिच्या स्तनांवर हात ठेवला. या मिठीचा फोटो पोलिसांनी मागितला आहे.
हेही वाचा >> पुढच्या सहा तासांत ‘बिपरजॉय’ होणार अत्यंत तीव्र चक्रीवादळ, कराची पोर्ट ट्रस्टवर रेड अलर्ट जारी; मुंबईवरील धोका टळला?
पोलिसांकडून विविध पुराव्यांची मागणी
घडलेल्या घटनांची तारीख, वेळ, कार्यालयात घालवलेला वेळ, रुममेट्सची माहिती पोलिसांनी कुस्तीपटूंकडून मागितली आहे. तसंच, परदेशात ज्यावेळी असा प्रकार घडला तेव्हाच्या साक्षीदारांची नावेही पोलिसांनी मागितली आहेत.
धमकीचे पुरावे द्या
तक्रार दाखल केल्यानंतर ब्रिजभूषण सिंह यांनी संबंधित तक्रारदाराला धमकी दिली होती, असाही आरोप सिंह यांच्यावर केला जातोय. त्यामुळे या आरोपाची शहानिशा करण्याकरता धमकीचे पुरावेही पोलिसांनी मागितले आहेत. धमक्या देणाऱ्या कॉल्सशी संबंधित व्हिडीओ, फोटो, कॉल रेकॉर्डिंग, व्हॉट्सअॅपची चॅट सादर करण्याची नोटीस पोलिसांनी संबंधित तक्रादरा महिला कुस्तीपटूला पाठवली आहे. नोटिसांवर कॅनॉट प्लेस पोलीस ठाण्याच्या तपास अधिकाऱ्यांची स्वाक्षरी आहे.