Shabnim Ismail’s fastest ball in WPL 2024 : मुंबई इंडियन्सची वेगवान गोलंदाज शबनीम इस्माईलने मंगळवारी महिला प्रीमियर लीग २०२४ मध्ये दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात इतिहास रचला. तिने महिला क्रिकेट इतिहासातील सर्वात वेगवान चेंडू टाकला. महिला क्रिकेटमध्ये स्पीड मीटरवर ताशी १३० किलोमीटरचा टप्पा ओलांडण्याची ही पहिलीच वेळ आहे. या सामन्यात शबनिमने दिल्लीच्या डावातील तिसऱ्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर हा विक्रम केला. दक्षिण आफ्रिकेकडून आंतरराष्ट्रीय सामने खेळणाऱ्या शबनिमने दिल्लीची कर्णधार मेग लॅनिंगकडे फुल लेन्थ चेंडू टाकला. तो लॅनिंगच्या पॅडला लागला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ताशी १३२.१ किमी वेगाने फेकला गेला चेंडू –

मुंबई संघाने एलबीडब्ल्यूचे अपील केली, पण पंचांनी ती फेटाळली. त्यामुळे या चेंडूवर विकेट मिळाली नाही, परंतु लवकरच स्टेडियममधील मोठ्या स्क्रीनवर चेंडूचा वेग १३२.१ किलोमीटर प्रतितास (82.08 mph) असल्याचे नोंदवले गेले. यानंतर संपूर्ण स्टेडियमने शबनिमसाठी टाळ्या वाजवल्या. जेव्हा तिला विचारले गेले की आतापर्यंतचा सर्वात वेगवान चेंडू टाकून इतिहास रचला हे माहित आहे का? डाव संपल्यानंतर शबनिम म्हणाली, ‘जेव्हा मी गोलंदाजी करत असते तेव्हा मी पडद्याकडे पाहत नाही.’

शबनिमने मोडला तिचाच विक्रम –

शबनिमने महिला क्रिकेटमधील सर्वात वेगवान चेंडूचा स्वतःचा विक्रम मोडला. ताशी १३२.१ किमीचा वेग गाठण्यापूर्वी शबनीमने १२८ किमी प्रतितास या विक्रमी वेगाने चेंडू टाकला होता. तिने २०१६ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध १२८ किलोमीटर प्रतितास (79.54 mph) आणि २०२२ मधील महिला एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत दोनदा १२७ किलोमीटर प्रतितास वेगाने गोलंदाजी केली होती. इस्माईलने १६ वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत दक्षिण आफ्रिकेसाठी १२७ वनडे, ११३ टी-२० आणि एक कसोटी सामना खेळला आहे.

हेही वाचा – ‘कॅन्डिडेट्स’मध्ये सलामीलाच;भारतीय बुद्धिबळपटू आमनेसामने

शबनीम इस्माईलने हा विक्रम केला, पण दिल्लीविरुद्धची तिची कामगिरी काही खास नव्हती. तिने खूप धावा खर्च केल्या. शबनिमने पहिल्या दोन षटकात १४ धावा दिल्या. शफाली वर्माने तिच्या तिसऱ्या षटकात दोन मोठे षटकार ठोकले. मात्र, नंतर शबनिमने शेफालीला नक्कीच बाद केले. शफालीला २८ धावा करता आल्या. शबनिमने चार षटकात ४६ धावा दिल्या आणि एक विकेट घेतली. दिल्लीने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ४ गडी गमावून १९२ धावा केल्या होत्या. कर्णधार लॅनिंगने ५३ धावा, जेमिमाह रॉड्रिग्जने ६९ धावांची नाबाद खेळी केली. प्रत्युत्तरात मुंबईचा संघ २० षटकांत आठ गडी गमावून केवळ १६३ धावा करू शकला. अमनजोत कौरने सर्वाधिक ४२ धावा केल्या. तर, हेली मॅथ्यूजने २९ आणि सजीवन सजनाने नाबाद २४ धावा केल्या.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shabnim ismail created history by bowling the fastest ball in wpl 2024 mi vs dc match updates vbm