पाकिस्तानचा अष्टपैलू खेळाडू शादाब खान सध्या होबार्ट हरिकेन्सच्या संघाकडून बिग बॅश लिगमध्ये खेळत आहे. नुकताच त्याने स्वत:च्याच गोलंदाजीवर एक भन्नाट झेल घेतला. पर्थ स्कॉचर्सच्या संघाविरुद्धच्या सामन्यामध्ये शादाबने हा अफलातून झेल घेतला. हा सामना शादाबच्या संघाने आठ धावांनी जिंकला. होबार्टच्या संघाने ठेवलेलं १७३ धावांचं लक्ष्य गाठताना पर्थच्या संघाला १६४ धावांपर्यंत मजल मारता आली.
शेवटून दुसऱ्या षटकामध्ये १२ धावांवर फलंदाजी करत असलेला अॅरॉन हार्डीने फिरकी चेंडूवर फटका मारण्याचा प्रयत्न केला. शादाब गोलंदाजीला आला तेव्हा शेवटच्या १२ चेंडूंमध्ये पर्थच्या संघाला १८ धावांची गरज होती. शादाबने त्याच्या शेवटच्या षटकामध्ये सहा चेंडूंमध्ये चार धावा देऊन एक गडी बाद केला. शादाबच्या भन्नाट गोलंदाजीमुळे शेवटच्या षटकामध्ये पर्थच्या संघाला सहा चेंडूंमध्ये १४ धावांची गरज होती आणि त्यांना केवळ सहाच धावा करता आल्या.
हार्डीने शादाबच्या फिरकी गोलंदाजीवर सरळ फटका खेळण्याचा प्रयत्न केला. हार्डीने मारलेला चेंडू थेट शादाबच्या उजवीकडून नॉन स्ट्राइकर एण्डच्या फलंदाजाकडे जात होता. मात्र शादाबने चपळतेने चेंडूच्या दिशेने झेप घेतली आणि हवेत असतानाच चेंडू पकडला.
शादाबने ५.५० च्या सरासरीने २२ धावा दिल्या. यापूर्वी शादाबने फलंदाजी करताना १७ चेंडूंमध्ये २२ धावा केल्या. मॅथ्यू वेडने होबार्टच्या संघासाठी २९ चेंडूंमध्ये ५१ धावा केल्या. तर टीम डेव्हीडने २८ चेंडूंमध्ये ४६ धावा केल्याने संघाला २० षटकांमध्ये १७२ धावांपर्यंत मजल मारता आली.