Women’s T20 WC 2020 : स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा ८५ धावांनी पराभव करत पाचवे टी २० विश्वविजेते पटकावले. सलामीवीर एलिसा हेली (७५) आणि बेथ मूनी (७८*) यांच्या फटकेबाजीच्या बळावर ऑस्ट्रेलियाने ४ बाद १८४ धावांची मजल मारली. या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय महिला फलंदाजांनी अत्यंत दीनवाणी कामगिरी केली. शफाली वर्मा, स्मृती मानधना, हरमनप्रीत कौर, जेमायमा रॉड्रीग्ज या भरवशाच्या फलंदाजांनी दडपणाखाली अतिशय बेजबाबदार हवाई फटके खेळत आपल्या विकेट्स ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना बहाल केल्या. या पराभवानंतर १६ वर्षीय शफाली वर्माला अश्रू अनावर झाल्याचे दिसून आले.
T20 World Cup : स्पर्धा गाजवणारी शफाली फायनलमध्ये अपयशी
शफालीने संपूर्ण स्पर्धेत दमदार कामगिरी केली. प्रत्येक सामन्यात शफालीने धडाकेबाज कामगिरी करत भारताला विजय मिळवून दिला. शफालीने पहिल्या सामन्यात २९, दुसऱ्या सामन्यात ३९, तिसऱ्या सामन्यात ४६ तर चौथ्या सामन्यात ४७ धावा केल्या. यात दोन सामन्यांमध्ये तिने सामनावीराचा किताब पटकावला. पण अंतिम सामन्यात मात्र ती ३ चेंडूत २ धावा करून बाद झाली. मेगन शूटच्या गोलंदाजीवर हेलीने तिचा झेल टिपत भारताला मोठा धक्का दिला. त्यामुळे पराभवानंतर तिने अश्रूंवाटे आपल्या भावनांना वाट करून दिली.
An arm around the shoulder for the find of the tournament #T20WorldCup pic.twitter.com/bKDK1PxWZm
— T20 World Cup (@T20WorldCup) March 8, 2020
T20 World Cup Final : हरमनप्रीतसाठी अंतिम सामना ‘ट्रिपल स्पेशल’, कारण…
असा रंगला अंतिम सामना
नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी केली. ऑस्ट्रेलियन सलामीवीर बेथ मूनी आणि एलिसा हेली यांनी धडाकेबाज सुरूवात केली. क्रिकेटपटू मिचेल स्टार्कची पत्नी आणि ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेट संघाची सलामीवीर एलिसा हेलीने ३९ चेंडूत ७ चौकार आणि ५ षटकारांसह ७५ धावा केल्या. धडाकेबाज अर्धशतकी खेळीनंतर एलिसा हेली झेलबाद झाली. त्यानंतर सलग तीन सामन्यांत चांगली कामगिरी करणाऱ्या सलामीवीर बेथ मूनीने जबाबदारीने खेळ केला. तिने नाबाद ७८ धावांची खेळी करत ऑस्ट्रेलियाला १८४ ची धावसंख्या गाठून दिली. संपूर्ण स्पर्धेत दर्जेदार कामगिरी करणाऱ्या भारतीय गोलंदाजांनी अंतिम सामन्यात प्रचंड धावा खर्च केल्या.
या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय फलंदाजांनी अतिशय खराब कामगिरी केली. भारताकडून स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारी सलामीवीर शफाली वर्मा ही अंतिम सामन्यात अयशस्वी ठरली. सामन्याच्या तिसऱ्याच चेंडूवर ती २ धावा काढून बाद झाली. त्यानंतर दुखापतग्रस्त तानिया भाटीयाच्या जागी मैदानावर आलेली जेमायमा रॉड्रीग्ज शून्यावर माघारी परतली. आधीच्या षटकात २ चौकार लगावलेली स्मृती मानधना ११ धावा करून बाद झाली. कर्णधार हरमनप्रीत कौर ४ धावांवर माघारी परतली. दिप्ती शर्माने झुंज देत सर्वाधिक ३३ धावा केल्या. पण इतर फलंदाजांनी साफ निराशा केली. भारताचे तब्बल ६ फलंदाज एक आकडी धावसंख्येवर बाद झाले. ऑस्ट्रेलियाकडून मेगन शूटने सर्वाधिक ४ बळी टिपले.