वनडे मालिकेत वर्चस्व गाजवल्यानंतर भारतीय महिला क्रिकेट संघाने चेन्नईत सुरू असलेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकमेव कसोटीचा पहिला दिवस शफाली वर्माने गाजवला. भारतासाठी द्विशतकी खेळी साकारणारी ती केवळ दुसरी खेळाडू ठरली आहे. याआधी मिताली राजने इंग्लंडविरुद्ध २००२ मध्ये टाँटन इथे २१४ धावांची खेळी केली होती.
स्मृती-शफाली जोडीने महिला क्रिकेटमध्ये सर्वोत्तम सलामीचा पाकिस्तानच्या किरण बलूच आणि साजिदा शाह यांचा २० वर्षांपूर्वीचा २४१ धावांचा विक्रम मोडला. स्मृती-शफाली जोडीने ३१२ चेंडूतच २९२ धावांची भागीदारी केली. या जोडीने भारतीय महिला क्रिकेटमधला सर्वोत्तम सलामीचा त्यांचाच विक्रमही मोडला.
हरयाणा हरिकेन नावाने प्रसिद्ध शफाली वर्माने आफ्रिकेच्या गोलंदाजांचा खरपूस समाचार घेत द्विशतकी खेळी साकारली. शफालीच्या बॅटचा तडाखा सुरू असतानाच स्मृती मानधनाने देखणी शतकी खेळी साकारली. शफालीच्या वादळी खेळीच्या बळावर भारतीय संघाने ७३व्या षटकातच ४०० धावांची वेस ओलांडली आहे. डेल्मी टकरच्या गोलंदाजीवर दोन खणखणीत षटकारांनंतर एकेरी धाव घेत शफालीने पहिल्यावहिल्या ऐतिहासिक द्विशतकाला गवसणी घातली. शफालीच्या २०५ धावांच्या खेळीत २३ चौकार आणि ८ षटकारांचा समावेश आहे.
स्मृतीने २७ चौकार आणि एका षटकारासह १४९ धावांची सुरेख खेळी केली. शफाली-स्मृतीच्या भागीदारीसमोर दक्षिण आफ्रिकेचे गोलंदाज निरुत्तर ठरले. या दोघींनी २९२ धावांची सलामी दिली. महिला क्रिकेटसाठी पहिल्या विकेटसाठीची ही सर्वोत्तम भागीदारी आहे.