बांगलादेशचा वेगवान गोलंदाज शहादत हुसेनचे स्थानिक क्रिकेटमध्ये पुमरागमन झाले आहे. बांगलादेश क्रिकेट बोर्डाने (बीसीबी) हुसेनवर पाच वर्षांची बंदी घातली होती, मात्र ती १८ महिने अशी करण्यात आली. प्रथम श्रेणी सामन्यात आपल्याच संघातील खेळाडूला कानशिलात लगावल्यानंतर हुसेनवर बंदी घालण्यात आली होती. यानंतर हुसेन बंदी कमी करण्यासाठी अपील केले होते.

नोव्हेंबर २०१९मध्ये प्रथम श्रेणी सामन्यादरम्यान एका खेळाडूला कानशिलात लगावल्यानंतर हुसेनवर ५ वर्षे बंदी घालण्यात आली. पण आपली कारकीर्द पुन्हा सुरू व्हावी आणि कर्करोगाने ग्रस्त असलेल्या आईच्या उपचारासाठी निधी जमा करावा यासाठी त्याने फेब्रुवारी महिन्यात बंदी कमी करण्यासाठी अपील केले होते. ”मला क्रिकेटशिवाय दुसरे काही काम येत नाही, त्यामुळे बंदी उठवल्यानंतर मी पुन्हा क्रिकेट खेळू शकेन आणि माझ्या आईवर उपचार करू शकेन”, असे हुसेनने सांगितले होते.

हेही वाचा – ‘‘सचिननं मला सामना गंभीरतेनं खेळू नकोस असं सांगितलं होतं”

क्रिकबझच्या वृत्तानुसार, बीसीबीच्या अधिकाऱ्याने हुसेनवरील बंदी कमी केली असल्याचे सांगितले आहे. बंदी उठल्यानंतर हुसेन ढाका प्रीमियर डिव्हिजन टी-२० क्रिकेट लीगमध्ये ओल्ड डीओएचएस स्पोर्ट्स क्लब विरुद्ध पार्टेक्स स्पोर्टिंग क्लबकडून खेळला. मात्र, त्याला आपल्या दोन षटकात एकही बळी घेता आला नाही. शेर-ए-बांगला राष्ट्रीय स्टेडियमवर हा सामना रंगला.

हेही वाचा – ‘‘देशाकडून खेळण्यासाठी माझ्या कातडीचा रंग योग्य नाही, असं मला सांगण्यात आलं”

यापूर्वी त्याने एनसीएलमध्ये स्थान मिळवण्याचा प्रयत्न केला, पण बांगलादेशात करोनाच्या दुसर्‍या लाटामुळे ही स्पर्धा एप्रिलमध्ये पुढे ढकलण्यात आली. शहादत हुसेनने ३८ कसोटी सामन्यांमध्ये ७२ बळी घेतले आहेत. अशी कामगिरी करणारा तो बांगलादेशचा दुसरा सर्वाधिक विकेट घेणारा वेगवान गोलंदाज आहे. ३४ वर्षीय हुसेन २०१५च्या पाकिस्तानविरूद्ध ढाका कसोटी सामन्यानंतर बांगलादेशसाठी क्रिकेट खेळलेला नाही.