भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील रांचीमध्ये खेळलेला दुसरा एकदिवसीय सामना शाहबाद अहमदच्या आयुष्यातील सर्वात सुंदर दिवस होता. हरियाणाच्या पलवल येथील रहिवासी असलेल्या शाहबाजने भारतासाठी पदार्पण केले. पदार्पणाच्या सामन्याने त्याचे सर्वात मोठे स्वप्न पूर्ण झाले, परंतु त्याच्या वडिलांची प्रतिक्रिया थोडी वेगळी आहे. शाहबाजचे वडील आपल्या मुलाच्या यशाने खूश आहेत, पण आजही त्यांना अभ्यास सोडून क्रिकेट खेळण्याची बाब मान्य करता येत नाही.
भारतासारख्या देशात प्रत्येकालाच असं वाटत की, एक दिवस मी सुद्धा भारतीय संघाकडून क्रिकेट खेळणार पण सर्वानाच ते शक्य होत नाही. पण एका यशस्वी क्रिकेटपटूला कोणत्या दिव्यातून जावं लागत याची जाणीव शाहबाजच्या वडिलांना होती. म्हणून इंडियन एक्स्प्रेसशी संवाद साधताना शाहबाजचे वडील अहमद जान म्हणाले की, त्यांच्या घरात अभ्यासाला खूप महत्त्व दिले जात होते आणि शाहबाज स्वतःअभ्यासात खूप हुशार होता. शाहबाजला १०वीत ८० टक्के आणि १२वीत ८८ टक्के गुण मिळाले होते. मात्र, त्यानंतर त्याने क्रिकेटकडे वळण्याचा धक्कादायक निर्णय घेतला.”
अहमद जान पुढे असे म्हणतात, “माझे वडील मुख्याध्यापक होते. मी सरकारी नोकरी करतो. माझा भाऊ शिक्षक आहे आणि माझी मुलगी डॉक्टर आहे. मी स्वप्नातही विचार केला नव्हता की शाहबाज आपले शिक्षण सोडून क्रिकेट खेळेल. कोणाचे वडील असा विचार करतील की, आपल्या मुलाने क्रिकेट खेळण्यासाठी आपला अभ्यास सोडून फक्त क्रिकेटच खेळत राहावे.”
शाहबाज अभियांत्रिकीचे शिक्षण घेत होता, मात्र तो अनेक महिन्यांपासून कॉलेजला गेला नव्हता. कॉलेजचे पत्र त्यांच्या घरी आल्यावर त्यांच्या पालकांना हा प्रकार कळला. जेव्हा ते कॉलेजमध्ये पोहोचले तेव्हा शाहबाजही तिथे नव्हता आणि नंतर त्याच्या वडिलांना समजले की त्यांच्या मुलाने क्रिकेटसाठी शिक्षण सोडण्याचा निर्णय घेतला आहे. शाहबाज कोलकात्याला गेला आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या संघात स्थान मिळवण्यासाठी त्याने तिथे संघर्ष केला. आता तो भारताकडूनही खेळत आहे.
हरियाणातील नूह येथील रहिवासी असलेल्या शाहबाजच्या रक्तात क्रिकेटचे कौशल्य आहे. आजोबांनाही क्रिकेट खेळण्याची आवड होती पण त्याकाळी त्यांचा हा छंद पूर्ण होईल अशा सुविधा नव्हत्या. शाहबाजने वयाच्या चौथ्या वर्षी क्रिकेट खेळायला सुरुवात केली. शाहबाजच्या वडिलांनी एका मुलाखतीत सांगितले होते की, ते लहानपणी मुलासोबत क्रिकेट खेळायचे. तो गोलंदाजी करायचा आणि शाहबाज फलंदाजी.
हेही वाचा : बीसीसीआय तिजोरीच्या चाव्या आशिष शेलारांकडे?, खजिनदारपदी वर्णी लागण्याची शक्यता
एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणारा शाहबाज हा २४७ वा क्रिकेटपटू ठरला आहे. झिम्बाब्वे दौऱ्यावरही त्याचा भारतीय संघात समावेश करण्यात आला होता पण त्याला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत दोन सामन्यात मिळून ३ बळी घेतले.