विंडीजवर सहा गडी राखून मात; नदीमचे सामन्यात १० बळी
डावखुरा फिरकी गोलंदाज शाहबाझ नदीमच्या प्रभावी गोलंदाजीच्या बळावर भारत ‘अ’ संघाने वेस्ट इंडिज ‘अ’ संघाविरुद्धचा पहिला कसोटी सामना चौथ्या दिवशी सहा गडी राखून जिंकला.
विजयासाठी ९७ धावांचे माफक आव्हान समोर असणाऱ्या भारत ‘अ’ संघाने दुसऱ्या डावातील एक बाद २९ धावंख्येवरून शनिवारी डावाला पुढे प्रारंभ केला. परंतु अखेरच्या दिवशी सकाळच्या सत्रातील १९.३ षटकांत आणखी तीन फलंदाजांना गमावून भारताने लक्ष्य साध्य केले. अभिमन्यू ईश्वरन (२७) सकाळी फक्त सहा चेंडू मैदानावर टिकाव धरू शकला. चेमार होल्डरने त्याला बाद केले. मग कर्णधार हनुमा विहारी (१९) आणि श्रीकार भरत (२८) यांनी तिसऱ्या गडय़ासाठी ४९ धावांची भागीदारी केली. त्यामुळे भारत ‘अ’ संघाला विजय साकारता आला.
३ बाद १५९ अशी दमदार मजल मारणाऱ्या वेस्ट इंडिज ‘अ’ संघाचा डाव शुक्रवारी फक्त १८० धावांत गडगडला. नदीमने २१ षटकांत ४७ धावांत पाच बळी घेत महत्त्वाची भूमिका बजावली. नदीमने या सामन्यात १०९ धावांत १० बळी मिळवले आहेत. वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने तीन बळी घेतले.
भारत ‘अ’ संघाने ८ बाद २९९ या धावसंख्येवरून आपल्या पहिल्या डावाला पुढे प्रारंभ केला. परंतु १०४.३ षटकांत भारताला ३१२ धावांपर्यंतच मजल मारता आली. यष्टिरक्षक वृद्धिमान साहा (६६) सर्वात शेवटी बाद झाला.
मग पहिल्या डावात ८४ धावांनी पिछाडीवर पडलेल्या वेस्ट इंडिजला दुसऱ्या डावात १८० धावांपर्यंत मजल मारता आली. कर्णधार शामार ब्रुक्सने ५३ धावा केल्या, तर रोस्टन चेसने (३२) त्याच्यासोबत तिसऱ्या गडय़ासाठी ७९ धावांची भागीदारी केली.
संक्षिप्त धावफलक
- वेस्ट इंडिज ‘अ’ (पहिला डाव) : २२८
- भारत ‘अ’ (पहिला डाव) : ३१२ (शिवम दुबे ७१, वृद्धिमान साहा ६६; मिग्युएल कमिन्स ४/४०)
- वेस्ट इंडिज ‘अ’ (दुसरा डाव) : ७७ षटकांत सर्व बाद १८० (शामार ब्रुक्स ५३; शाहबाझ नदीम ५/४७)
- भारत ‘अ’ (दुसरा डाव) : ३० षटकांत ४ बाद ९७ (श्रीकार भरत २८, अभिमन्यू ईश्वरन २७; रहकीम कॉर्नवॉल २/१८).