सध्या क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांमधील पाकिस्तानी संघाची धुरा बाबर आझमच्या हाती देण्यात आलेली आहे. बाबर आझमदेखील कर्णधारपदाच्या लौकिकाला साजेसा खेळ करताना दिसत आहे. बाबर सध्या अतिशय चांगल्या फॉर्ममध्ये आहे. त्याने आपल्या शानदार फलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्याच्या झटपट धावा काढण्याच्या कौशल्यामुळे त्याची तुलना नेहमीच भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीशी केली जाते. पण, विराट सध्या खराब फॉर्मशी झुंजत आहे. अशा परिस्थितीमध्ये विराट कोहली आणि बाबर आझमपैकी कोण चांगला फलंदाज आहे? हा प्रश्न दिवसेंदिवस रंजक होत चालला आहे. या प्रश्नावर आता पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदीने आश्चर्यकारक उत्तर दिले आहे.

ईएसपीएन क्रिकइन्फोशी बोलताना, शाहीनला रॅपिड-फायर राउंड दरम्यान कोहली आणि बाबर यांच्यापैकी कोण चांगले आहे? असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावर त्याने ‘मला दोघेही आवडतात’, असे उत्तर दिले. अशाच प्रश्न त्याला रिजवान आणि जोस बटलरबद्दलही विचारण्यात आला होता. तिथे मात्र त्याने पाकिस्तानच्या यष्टिरक्षकाचे नाव निवडले. शिवाय, पीएसएल ही स्पर्धा आयपीएलपेक्षा चांगली असल्याचेही म्हटले आहे.

२४ ऑक्टोबर २०२१ रोजी दुबई येथे झालेल्या टी ट्वेंटी विश्वचषकादरम्यान कोहली आणि शाहीनची मैदानात एकमेव भेट झाली होती. विराट तेव्हा भारतीय संघाचा कर्णधार होता. विराटने पाकिस्तानच्या या वेगवान गोलंदाजाला डावाच्या सुरुवातीला षटकार ठोकला. त्याला नंतर लगेचच शाहीनने त्याला बाद केले. त्याने त्या सामन्यात ४१ धावांत भारताचे तीन बळी घेतले होते.

त्या सामन्यात बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान यांना भारतीय गोलंदाज बाद करू शकले नव्हते. पाकिस्तानने हा सामना १० गडी राखून जिंकला होता. विश्वचषकात भारतीय संघाला पहिल्यांदाच पाकिस्तानच्या संघाकडून पराभूत व्हावे लागले होते. आता ऑस्ट्रेलियात खेळल्या जाणाऱ्या टी ट्वेंटी विश्वचषकात हे दोन्ही संघ पुन्हा एकदा समोरासमोर येणार आहेत. हा सामना २३ ऑक्टोबर २०२२ रोजी होणार आहे.

Story img Loader