Australia vs Pakistan 1st Test: पाकिस्तानचा संघ सध्या ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर आहे. उभय संघांमधील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना पर्थमध्ये खेळवला जात आहे. ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात दोन गडी गमावल्यानंतर २००+ धावा केल्या आहेत. सध्या डेव्हिड वॉर्नर (१३१*) आणि स्टीव्ह स्मिथ खेळपट्टीवर आहेत. शतक झळकावून वॉर्नरने या मालिकेसाठी संघात त्याच्या निवडीला विरोध करणाऱ्या मिचेल जॉन्सनला प्रत्युत्तर दिले. वॉर्नरची ही शेवटची कसोटी मालिका आहे. अशा स्थितीत जॉन्सन त्याला निरोपाची मालिका देण्याच्या विरोधात होता. जॉन्सनचे कसोटी कारकिर्दीतील हे २६ वे शतक होते.
पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यादरम्यान ऑस्ट्रेलियाचा खेळाडू स्टीव्ह स्मिथने शाहीन आफ्रिदीबाबत मोठे विधान केले आहे. तो म्हणाला, “वेगवान आणि उसळती खेळपट्टीवर ऑस्ट्रेलियाच्या वेगवान गोलंदाजांना अधिक मदत मिळेल. पर्थमधील पहिल्या कसोटीत पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हसन अली आणि शाहीन शाह आफ्रिदी यांना देखील ही खेळपट्टी अनुकूल आहे.”
स्मिथ पुढे म्हणाला, “शाहीन आफ्रिदी नेहमीच त्याच्या गोलंदाजीने फलंदाजांना अडचणीत आणतो. विशेषत: शाहीन आफ्रिदी नवीन चेंडूने गोलंदाजी करताना विरोधी संघासाठी खूप धोकादायक गोलंदाज आहे. उजव्या हाताच्या खेळाडूंना तो चेंडू कधी आत स्विंग करतो तर कधी ऑफ साइड द ऑफ स्टंप गोलंदाजी करत बाद करतो. त्याची ही चेंडू स्विंग करण्याची क्षमता नेहमीच फलंदाजांसाठी धोक्याची असते. कोणताही डावखुरा जो ते चांगल्या गतीने करू शकतो, तो नेहमीच विरोधी संघासाठी चिंतेचा विषय असतो. हे एक कौशल्य आहे जे आपण अनेकदा गोलंदाजीमध्ये पाहत नाही. मला वाटते की शाहीन चार वर्षांपूर्वी येथे शेवटचा सामना खेळायला आला होता आणि त्यात आत खूप सुधारणा झाली आहे.”
तत्पूर्वी, वॉर्नरने उस्मान ख्वाजाच्या साथीने लंच ब्रेकपर्यंत ऑस्ट्रेलियाला एकही विकेट गमावू दिली नाही. दोघांमध्ये पहिल्या विकेटसाठी १२६ धावांची भागीदारी झाली. वॉर्नरने कसोटी कारकिर्दीतील ३७वे अर्धशतक झळकावले. ख्वाजाने ९८ चेंडूत ४१ धावांची खेळी खेळली. त्याला शाहीन आफ्रिदीने यष्टिरक्षक सर्फराज अहमदच्या हाती झेलबाद केले. त्याचवेळी दुसरी विकेट मार्नस लाबुशेनच्या रूपाने पडली. तो २५ चेंडूत १६ धावा करून बाद झाला. फहीम अश्रफला लाबुशेनची विकेट मिळाली. खुर्रम शहजादच्या अप्रतिम गोलंदाजीवर स्टीव्ह स्मिथ सरफराज अहमदकरवी झेलबाद झाला, त्याने ६० चेंडूत ३१ धावा केल्या. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा ऑस्ट्रेलियाची धावसंख्या २४४/३ इतकी होती, वॉर्नर अजूनही खेळपट्टीवर टिकून आहे.
दोन्ही संघांची प्लेइंग-११
ऑस्ट्रेलिया: डेव्हिड वॉर्नर, उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, स्टीव्ह स्मिथ, ट्रॅविस हेड, मिच मार्श, अॅलेक्स कॅरी, मिचेल स्टार्क, पॅट कमिन्स (कर्णधार), नॅथन लियॉन, जोश हेझलवूड.
पाकिस्तान: इमाम उल हक, अब्दुल्ला शफीक, शान मसूद (कर्णधार), बाबर आझम, सौद शकील, सरफराज खान, सलमान अली आगा, फहीम अश्रफ, शाहीन शाह आफ्रिदी, आमिर जमाल, खुर्रम शहजाद.