Shaheen Shah Afridi and Babar Azam: शाहीन शाह आफ्रिदीने सोशल मिडिया प्लॅटफॉर्म ट्वीटरवर एक पोस्ट पोस्ट केली आहे, ज्यामध्ये त्याने विश्वचषक जिंकण्याचा विश्वास व्यक्त केला आहे. वास्तविक, पाकिस्तान क्रिकेट संघाने या विश्वचषकात आतापर्यंत अत्यंत खराब कामगिरी केली आहे. त्यांनी पहिला सामना नेदरलँड्सविरुद्ध आणि दुसरा श्रीलंकेविरुद्ध जिंकला, पण त्यानंतर भारत, ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तानविरुद्ध सलग तीनही सामने गमावले.
आता पाकिस्तान क्रिकेट संघाला उपांत्य फेरी गाठणे अशक्य असल्याचे दिसत आहे. मात्र, तरीही त्याच्या संघाने उर्वरित सर्व सामने जिंकले, तर ते उपांत्य फेरी गाठू शकतात. पाकिस्तान क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीने ट्वीटरवर पाकिस्तान संघ अजूनही हा विश्वचषक जिंकू शकतो अशी पोस्ट टाकून पाकिस्तानी चाहत्यांच्या मनात नवा आत्मविश्वास निर्माण केला आहे.
पाकिस्तान विश्वचषक जिंकणार का?
शाहीन शाह आफ्रिदीने आपल्या पोस्टमध्ये बाबर आझमसोबतचा फोटो शेअर केला आणि लिहिले, “आमच्यात एकता आहे. कितीही चढ-उतार असो, आम्ही एकत्र उभे आहोत आणि नेहमीच एकमेकांना मदत करत राहू. एकता ही अशी शक्ती आहे जी आम्हाला एकत्र बांधते आणि विश्वास निर्माण करते. एकत्रित संघाची शक्ती जी काहीही साध्य करू शकते. त्यामुळे विश्वचषक आमचा आहे, इंशाल्लाह. सर्वोत्कृष्ट खेळी करून आम्ही नक्की चॅम्पियन्स होऊ.”
माहितीसाठी की, या विश्वचषक स्पर्धेतील पुढचा प्रवास पाकिस्तान क्रिकेट संघासाठी सोपा नसेल, कारण त्यांना उर्वरित सामने दक्षिण आफ्रिका, बांगलादेश, न्यूझीलंड आणि इंग्लंडविरुद्ध खेळायचे आहेत. अशा स्थितीत त्यांच्या ४ सामन्यांपैकी ३ सामने मोठ्या संघांविरुद्ध आहेत, तर बांगलादेशविरुद्धचा सामनाही सोपा नसेल. अशा स्थितीत पाकिस्तानला येथून उपांत्य फेरी गाठणे सोपे जाणार नाही. आता या विश्वचषकात पाकिस्तानचा संघ किती मजल मारतो हे पाहावे लागेल.
बाबर आझम आणि शाहीन आफ्रिदी आमनेसामने?
क्रिकबझच्या रिपोर्टनुसार, आशिया चषकापासून हे पाहिले जात होते. त्याचवेळी बाबर आझम आणि शाहीन आफ्रिदीचे दोन गट पडले आहेत. मोहम्मद रिजवान आणि इफ्तिखार अहमद हेही शाहीनच्या गटात सामील झाल्याच्या बातम्या आल्या होत्या. मात्र पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने या सर्व गोष्टी अफवा असल्याचे सांगत त्याचे खंडन केले आहे.
पीसीबीने उत्तर दिले
या संपूर्ण प्रकरणावर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने एक निवेदन जारी करून म्हटले आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आपल्या प्रसिद्धीमध्ये लिहिले आहे की, “बोर्ड २०२३च्या विश्वचषक स्पर्धेत सहभागी होणाऱ्या संघामध्ये कोणताही वाद असल्याच्या या सर्व चर्चांना फेटाळतो आहोत. प्रसारमाध्यमांच्या काही पत्रकारांनी या बातमीचा प्रचार केला आहे पण ती निव्वळ अफवा आहे आणि त्याला कोणताही पुरावा नाही. पीसीबी आपली निराशा व्यक्त करते आणि अशा खोट्या बातम्या पसरवल्याचा निषेध करते.”